Himnat Biswa Sarma on Rahul Gandhi: Adani सोबत राहुल गांधींनी 5 माजी कॉंग्रेसच्या नेत्यांना जोडत केलेल्या ट्वीट वर पहा Himnat Biswa Sarma, Anil Antony यांनी केलेला पलटवार
अदानींसोबत गुलाम नबी आजाद, ज्योतिरादित्य सिंधिया, किरण रेड्डी, हिमंत बिस्वा सरमा आणि अनिल एंटनी यांचं नाव जोडत राहुल गांधींनी ट्वीट केलं आहे.
गौतम अदानी प्रकरणावरून राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी सत्ताधार्यांवर हल्लाबोल कायम ठेवला आहे. पण आज अदानी यांच्या नावासोबत अप्रत्यक्षपणे कॉंग्रेसच्याच 5 माजी नेत्यांना जोडून पुन्हा शेल कंपन्यांमधील 20 हजार कोटी कुठून आले? हा प्रश्न विचारला आहे. त्याबाबत केलेलं ट्वीट आज चर्चेचा विषय बनला आहे. दरम्यान त्यांनी पूर्ण नावाचा उल्लेख केला नसला तरीही अदानींसोबत गुलाम नबी आजाद, ज्योतिरादित्य सिंधिया, किरण रेड्डी, हिमंत बिस्वा सरमा आणि अनिल एंटनी यांचं नाव जोडलं आहे. त्यापैकी ट्वीटला ट्वीटनेच उत्तर देत अनिल एंटनी आणि हिमंत बिस्वा सरमा यांनी प्रत्युत्तर दिले आहे.
कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते ए के अँटोनी यांचा मुलगा अनिल अँटनी यांनी काहीच दिवसांपूर्वी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. आज राहुल गांधी यांच्या ट्वीटला उत्तर देताना त्यांनी 'एका राष्ट्रीय पक्षाचे माजी अध्यक्ष आणि कथित पंतप्रधानपदाचे उमेदवार राहुल गांधी हे राष्ट्रीय नेते नसून ऑनलाइन/सोशल मीडिया सेल ट्रोलसारखे बोलत असल्याचे पाहून वाईट वाटते. ' पुढे त्यांनी 'राष्ट्र उभारणीत अनेक दशके योगदान देणाऱ्या या दिग्गजांसह माझे नाव पाहून खूप आनंद झाला आणि त्यांनी एका कुटुंबासाठी नव्हे तर भारत आणि आपल्या लोकांसाठी काम करण्याचा निर्णय घेतल्याने पक्ष सोडावा लागला.' असेही नमूद केले आहे. नक्की वाचा: CR Kesavan Joins BJP: माजी काँग्रेस नेते आणि भारताचे पहिले भारतीय गव्हर्नर जनरल सी राजगोपालाचारी यांचे नातू सीआर केसवन यांनी भाजपमध्ये केला पक्षप्रवेश .
अनिल अँटनी ट्वीट
दरम्यान आसामचे मुख्यमंत्री हिमंत बिस्वा सरमा यांनी ट्वीट करत राहुल गांधींना बोल सुनावले आहेत. 'बोफोर्स आणि नॅशनल हेराल्ड घोटाळ्यांतील गुन्ह्यांचे पैसे तुम्ही कुठे लपवलेत, हे तुम्हाला कधीच विचारले नाही ही आमची शालीनता होती. असो आम्ही कायद्याच्या न्यायालयात भेटू,' असे त्यांनी ट्विट केले आहे.
हिमंत बिस्वा सरमा ट्वीट
काही दिवसांपूर्वी लोकसभेमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गौतम अदानी यांचा जुना फोटो दाखवत राहुल गांधींनी पंतप्रधानांसोबत अदानींच्या जुन्या संबंधावर प्रश्न विचारला आहे. तेव्हापासून लोकसभेही गोंधळ पहायला मिळाला. राहुल गांधींनी यानंतर आपल्याला बोलू न दिल्याचं म्हटलं आहे. पुढील काही दिवसांतच त्यांच्यावर आक्षेपार्ह विधानप्रकरणी सुरत कोर्टाने 2 वर्षांची शिक्षा दिल्याच्या निर्णयानंतर लोकसभा सचिवालयानेही तातडीने कारवाई करत राहुल गांधींची खासदारकी रद्द केली आहे.