लोकसभा निवडणूक 2019: अभिनेता कृष्णा अभिषेक देणार काँग्रेसला हात? उत्तर मुंबई मतदारसंघातून राजकारणाच्या मैदानात?

कारण गेल्या काही वर्षांतील या मतदारसंघाचा इतिहास पाहता इथे भाजपचाच उमेदवार निवडूण आला आहे. नाही म्हणायला काँग्रेसचे उमेदवारही इथे निवडून आले आहेत. पण, त्याचे प्रमाण अगदीच नगण्य आहे. त्यामुळे भाजपच्या किल्ल्यात झेंडा रोवण्यासाठी काँग्रेस जोरदार प्रयत्नशील आहे.

Krushna Abhishek may contest the 2019 Lok Sabha election from Mumbai North on a Congress ticket | (Photo courtesy: archived, edited, representative image)

Lok Sabha Election 2019: भाजपचा बालेकिल्ला म्हणून ओळखल्या जाणाऱ्या उत्तर मुंबई लोकसभा मतदारसंघत 2019 च्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसचा (Congress)चेहरा कोण? याबाबत उत्सुकता असतानाच अभिनेता आणि कॉमेडीयन कृष्णा अभिषेक (Krushna Abhishek) याचे नाव जोरदार चर्चेत आले आहे. उत्तर मुंबई लोकसभा मतदारसंघासाठी (Mumbai North Constituency) काँग्रेस नवा आणि राजकीयदृष्ट्या वलयांकीत असलेला चेहरा देण्याच्या विचारात आहे. त्यातूनच हे नाव पुढे आल्याचे समजते. कृष्णा अभिषेक हा अभिनेता गोविंदा आहुजा (Govinda Ahuja)याचा भाचा आहे. गोविंदाने 2004 मध्ये याच मतदारसंघातून काँग्रेसच्या तिकिटावर निवडणूक लढवली होती. या निवडणूकीत त्याने राम नाईक या भाजपच्या तगड्या उमेदवाराला पराभूत केले होते. त्यावेळी गोविंदा जायंट किलर ठरला होता. त्यामुळे या पार्श्वभूमिचा फायदा कृष्णा याला मिळू शकतो असा काँग्रेसमधील काहींचा होरा आहे. मंबई मिररने याबाबत वृत्त दिले आहे.

दरम्यान, 1980 पासून अपवाद वगळता या मतदारसंघातून भाजपचाच उमेदवार निवडून आला आहे. 2014 पासून भाजपचे गोपाळ शेट्टी हे या मतदारसंघातील विद्यमान खासदार आहेत. त्याआधी 1991 पासून सलग 25 वर्षे भाजपचे राम नाईक हेच येथून निवडून येत. ते सध्या उत्तर प्रदेशचे राज्यपाल आहेत. मात्र, 2004च्या निवडणूकीत काँग्रेस उमेदवार गोविंदा आहूजा यांनी नाईक यांचा पराभव केला आणि ही परंपरा खंडीत झाली. त्यानंतर 2019मध्येही या मतदारसंघातून काँग्रेस उमेदवार संजय निरुपम विजयी झाले. मात्र, 2014मध्ये पुन्हा एकदा या ठिकाणी भाजपचा उमेदवार (गोपाळ शेट्टी) विजयी झाले.

दरम्यान, कृष्णा अभिषेक आणि काँग्रेस नेते संजय निरुपम यांच्यातही याबाबत नुकतीच भेट झाल्याचे समजते. काँग्रेसच्या एका गटाकडूनही कृष्णा अभिषेक याला उत्तर मुंबई मतदारसंघासाठी पसंती आहे. मात्र, त्याच्या उमेदवारीबाबत इतक्यातच काही निर्णय जाहीर केला जाणार नाही. काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांच्याशी चर्चा केली जाईल. त्यानंतरच या मतदारसंघातील उमेदवारीबाबत अंतीम निर्णय घेतला जाईल. राहुल गांधी यांचा निर्णय अंतीम असेल, असेही काँग्रेस सूत्रांनी म्हटले आहे. (हेही वाचा, 2019 मध्ये महाराष्ट्राचा पंतप्रधान ? राहुल गांधी नांदेड मतदारसंघातून लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात?)

उत्तर मुंबई लोकसभा मतदारसंघ गेल्या काही वर्षांतील इतिसाहस

लोकसभा - कालवधी

खासदार पक्ष
सहावी लोकसभा     १९७७-८० मृणाल गोरे

भारतीय लोक दल

सातवी लोकसभा      १९८०-८४

रविंद्र वर्मा

जनता पक्ष

आठवी लोकसभा     १९८४-८९

अनुपचंद शाह

भारतीय राष्ट्रीय काँग्रेस

नववी लोकसभा १९८९-९१

राम नाईक

भारतीय जनता पक्ष

दहावी लोकसभा १९९१-९६

राम नाईक

भारतीय जनता पक्ष

अकरावी लोकसभा १९९६-९८

राम नाईक

भारतीय जनता पक्ष

बारावी लोकसभा १९९८-९९

राम नाईक

भारतीय जनता पक्ष

तेरावी लोकसभा १९९९-२००४

राम नाईक

भारतीय जनता पक्ष

चौदावी लोकसभा २००४-२००९

गोविंदा आहूजा

भारतीय राष्ट्रीय काँग्रेस

पंधरावी लोकसभा २००९-२०१४

 संजय निरुपम

भारतीय राष्ट्रीय काँग्रेस

सोळावी लोकसभा २०१४- गोपाळ शेट्टी

भारतीय जनता पक्ष

उत्तर मुंबई या मतदारसंघासाठी काँग्रेस आणि भाजप या दोन्ही पक्षात जोरदार चुरस आहे. कारण गेल्या काही वर्षांतील या मतदारसंघाचा इतिहास पाहता इथे भाजपचाच उमेदवार निवडूण आला आहे. नाही म्हणायला काँग्रेसचे उमेदवारही इथे निवडून आले आहेत. पण, त्याचे प्रमाण अगदीच नगण्य आहे. त्यामुळे भाजपच्या किल्ल्यात झेंडा रोवण्यासाठी काँग्रेस जोरदार प्रयत्नशील आहे. तर, आपला किल्ला कायम राखण्यासाठी भाजप मोर्चेबांधणी करत आहे. कोण किती ताकतवान हे मात्र आगामी लोकसभा निवडणूक निकालातच कळणार आहे.