AAP Maha Rally: पंतप्रधान नरेंद्र मोदी सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयालाही मानत नाहीत, देशातील लोकशाही संपली; अरविंद केजरीवाल यांचा मोदींवर निशाणा
केजरीवाल यांनी पंतप्रधानांवर सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाचे पालन न केल्याचा आरोप करत त्यांना अहंकारी म्हटलं आहे.
AAP Maha Rally: केंद्राच्या अध्यादेशाविरोधात रविवारी रामलीला मैदानावर आम आदमी पक्षाची मेगा रॅली होत आहे. दिल्ली पोलिसांनी रॅलीच्या ठिकाणी आणि परिसरात कडेकोट सुरक्षा व्यवस्था ठेवली आहे. या रॅलीच्या माध्यमातून आम आदमी पक्षाने केंद्राच्या अध्यादेशाविरोधात आपला रोष व्यक्त केला. यादरम्यान 'महा रॅली'ला (AAP Maha Rally) संबोधित करताना दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल (Arvind Kejriwal) यांनी केंद्र सरकारवर हल्लाबोल केला. केजरीवाल यांनी पंतप्रधानांवर सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाचे पालन न केल्याचा आरोप करत त्यांना अहंकारी म्हटलं आहे.
यावेळी अरविंद केजरीवाल म्हणाले की, 'रामलीला मैदानावर एक ते 1.25 लाख लोक उपस्थित आहेत. सध्या बाहेरून सुमारे 20-25 हजार लोक येत आहेत. 19 मे रोजी देशाच्या पंतप्रधानांनी सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय फेटाळला आहे. सर्वोच्च न्यायालयावर माझा विश्वास नाही, असे पंतप्रधान म्हणाले. 75 वर्षांच्या इतिहासात प्रथमच असा पंतप्रधान आला आहे, जो सर्वोच्च न्यायालयावर विश्वास ठेवत नाही, असे सांगतो. संपूर्ण देशातील जनता हादरली आहे. अशा अहंकारी पंतप्रधानांवर देशातील जनता विश्वास ठेवू शकत नाही. (हेही वाचा - Amit Shah On Uddhav Thackeray: मुख्यमंत्री होण्यासाठी उद्धव ठाकरेंनी भाजपशी गद्दारी केली; अमित शहा यांचा ठाकरेंवर निशाणा)
सर्वोच्च न्यायालयाने आपल्या आदेशात दिल्लीतील जनता सर्वोच्च असल्याचे म्हटले होते, परंतु पंतप्रधानांनी हा अध्यादेश काढला आणि आदेश फेटाळला. आता दिल्लीत लोकशाही राहणार नाही, असे या अध्यादेशात म्हटले आहे. दिल्लीत आता हुकूमशाही चालणार आहे. आता जनता सर्वोच्च नाही. जनता ज्याला मत देईल आणि सरकार बनवेल, तो सरकार चालवेल असे पंतप्रधान म्हणतात. 26 जानेवारी 1950 रोजी राज्यघटना लागू झाली. आंबेडकरांनी संविधानात लिहिले की या देशात लोकशाही असेल, जनताच सर्वोच्च असेल. पंतप्रधानांनी भारताचे संविधान बदलले, असंही केजरीवाल यांनी म्हटलं आहे.
केजरीवाल यांनी पुढे बोलताना म्हटलं आहे की, मी या अध्यादेशाविरोधात सर्व पक्षांच्या नेत्यांची भेट घेत आहे. दिल्लीची जनता, संपूर्ण देशाची जनता तुमच्यासोबत आहे. 140 कोटी मिळून या अध्यादेशाला विरोध करतील आणि लोकशाही वाचवतील. हे फक्त दिल्लीकरांच्या बाबतीत घडले आहे असे समजू नका. असाच अध्यादेश राजस्थानसाठी, पंजाबसाठी, मध्यप्रदेशसाठी, महाराष्ट्रासाठी आणला जाईल. हे आता थांबवायला हवं, असंही केजरीवाल यांनी म्हटलं आहे.