G7 Summit: G-7 शिखर परिषदेत सहभागी होण्यासाठी पंतप्रधान मोदी इटलीला रवाना; तिसऱ्या कार्यकाळातील मोदींचा पहिला विदेश दौरा

आउटरीच सत्रात पंतप्रधान मोदी सहभागी होणार आहेत. परिषदेच्या पार्श्वभूमीवर, पंतप्रधान मोदी जी 7 देशांच्या नेत्यांसोबत द्विपक्षीय बैठकही घेण्याची शक्यता आहे.

PM Modi (PC - ANI)

G7 Summit: पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) जी-7 गटाच्या (G-7 Summit) वार्षिक शिखर परिषदेत सहभागी होण्यासाठी इटली (Italy) ला रवाना झाले आहेत. या शिखर परिषदेत प्रामुख्याने जागतिक भू-राजकीय अशांतता हाताळण्यावर भर असेल. उच्चस्तरीय शिष्टमंडळासह 14 जून रोजी ही शिखर परिषद होणार आहे. तिसऱ्यांदा पंतप्रधानपदी विराजमान झाल्यानंतर त्यांचा हा पहिलाच विदेश दौरा आहे. परराष्ट्र मंत्रालयाने म्हटले आहे की, ही शिखर परिषद भारत आणि ग्लोबल साउथसाठी महत्त्वाच्या मुद्द्यांवर जागतिक नेत्यांशी संपर्क साधण्याची एक चांगली संधी असेल. या शिखर परिषदेत भारताचा हा 11वा आणि पंतप्रधान मोदींचा सलग पाचवा सहभाग असेल. आउटरीच सत्रात पंतप्रधान मोदी सहभागी होणार आहेत. परिषदेच्या पार्श्वभूमीवर, पंतप्रधान मोदी जी 7 देशांच्या नेत्यांसोबत द्विपक्षीय बैठकही घेण्याची शक्यता आहे.

पंतप्रधान मोदी या समिटमध्ये इटलीचे पंतप्रधान ज्योर्जिया मेलोनी, फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन, जपानचे पंतप्रधान फुमियो किशिदा आणि कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रूडो यांच्यासोबत द्विपक्षीय बैठक घेणार आहेत. मोदींसोबत एक उच्चस्तरीय शिष्टमंडळ देखील असेल ज्यात परराष्ट्र मंत्री एस जयशंकर, परराष्ट्र सचिव विनय क्वात्रा आणि NSA अजित डोवाल यांचा समावेश असण्याची शक्यता आहे. (हेही वाचा - PM Modi Cabinet 3.0: पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या मंत्रिमंडळात कोण किती शिकलेलं? काही मंत्री 12वी पास तर काहींनीचं पूर्ण केली आहे पदव्युत्तर पदवी, वाचा सविस्तर)

दरम्यान, 50 वी G7 शिखर परिषद 13 ते 15 जून या कालावधीत इटलीच्या अपुलिया भागातील बोर्गो एग्नाझिया या रिसॉर्टमध्ये होणार आहे. युक्रेनमधील भीषण युद्ध आणि गाझामधील संघर्षाचा मुद्दा यात वरचढ ठरण्याची शक्यता आहे. युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष वोलोडिमिर झेलेन्स्की देखील त्यांच्या देशावरील रशियन आक्रमणावरील एका सत्राला संबोधित करतील. युक्रेन संघर्षाबाबत विचारले असता परराष्ट्र सचिव विनय क्वात्रा म्हणाले की, आम्ही नेहमीच असे म्हणत आलो आहोत की हा प्रश्न सोडवण्यासाठी संवाद आणि मुत्सद्दीपणा हा सर्वोत्तम पर्याय आहे. G7 शिखर परिषदेत भारताचा नियमित सहभाग जागतिक आव्हानांना तोंड देण्यासाठी महत्त्वाचा ठरणार आहे. (हेही वाचा -New Army Chief: लेफ्टनंट जनरल उपेंद्र द्विवेदी भारताचे पुढील लष्करप्रमुख; 30 जून रोजी स्वीकारणार पदभार)

क्वात्रा यांनी पुढे सांगितलं की, मोदी 14 जून रोजी इतर देशांशी संपर्क सत्रात सहभागी होतील. हे सत्र आर्टिफिशियल इंटेलिजन्स, ऊर्जा, आफ्रिका आणि भूमध्यसागरीय विषयांवर लक्ष केंद्रित करेल. G-7 शिखर परिषदेत पंतप्रधान मोदींचा सहभाग गेल्या वर्षी भारताच्या अध्यक्षतेखाली झालेल्या G-20 शिखर परिषदेच्या परिणामांवर चर्चा करण्याची संधी देईल. मोदी इटलीचे पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांच्यासोबत द्विपक्षीय बैठक घेणार आहेत. बैठकीत, दोन्ही पंतप्रधानांनी द्विपक्षीय संबंधांच्या संपूर्ण पैलूंचा आढावा घेणे आणि पुढील गोष्टींना दिशा देणे अपेक्षित आहे.