Tanzania: पंतप्रधान मोदींनी टांझानियाचे राष्ट्राध्यक्ष Samia Suluhu Hassan यांच्यासोबत घेतली द्विपक्षीय बैठक; दोन्ही देशांमध्ये अनेक महत्त्वपूर्ण करारांवर स्वाक्षऱ्या

आंतरराष्ट्रीय बिग कॅट अलायन्समध्ये सामील होण्याच्या टांझानियाच्या निर्णयामुळे दोन्ही देशांना या वन्य प्राण्यांच्या संवर्धनासाठी जागतिक समन्वयातून अधिक चांगले काम करता येईल, असे पंतप्रधान मोदी म्हणाले.

Tanzanian President Samia Suluhu Hassan received a ceremonial reception at Rashtrapati Bhavan (PC - ANI)

Tanzania: नवी दिल्लीतील हैदराबाद हाऊस (Hyderabad House) येथे पंतप्रधान मोदींनी (PM Modi) टांझानियाचे अध्यक्ष सामिया सुलुहू हसन (Samia Suluhu Hassan) यांच्यासोबत द्विपक्षीय बैठक घेतली. यावेळी भारताचे परराष्ट्र मंत्री एस जयशंकर हे देखील उपस्थित होते. पंतप्रधान मोदी आणि टांझानियाचे राष्ट्राध्यक्ष यांच्यात झालेल्या द्विपक्षीय बैठकीत अनेक महत्त्वाच्या करारांवर सहमती झाली. या पत्रकार परिषदेत पंतप्रधान मोदी म्हणाले की, भारत आणि टांझानिया यांच्यातील संबंधांसाठी आजचा दिवस ऐतिहासिक आहे. आज आम्ही आमच्या वर्षानुवर्षे जुन्या संबंधांना धोरणात्मक भागीदारीशी जोडत आहोत. भारत आणि टांझानिया हे परस्पर व्यापार आणि गुंतवणुकीसाठी महत्त्वाचे भागीदार देश आहेत. दोन्ही देश स्थानिक चलनात व्यापार वाढवण्यासाठी काम करत आहेत. टांझानियामध्ये आयसीटी केंद्रे, व्यावसायिक प्रशिक्षण आणि संरक्षण प्रशिक्षणाद्वारे कौशल्य विकास आणि क्षमता निर्माण करण्यासाठी भारताने महत्त्वपूर्ण योगदान दिले आहे. आम्ही जलव्यवस्थापन, कृषी, आरोग्य आणि शिक्षण या क्षेत्रात एकत्र काम करत आहोत आणि टांझानियाच्या लोकांच्या जीवनात सकारात्मक बदल घडवून आणण्याचा प्रयत्न करत आहोत.

तथापी, आंतरराष्ट्रीय बिग कॅट अलायन्समध्ये सामील होण्याच्या टांझानियाच्या निर्णयामुळे दोन्ही देशांना या वन्य प्राण्यांच्या संवर्धनासाठी जागतिक समन्वयातून अधिक चांगले काम करता येईल, असे पंतप्रधान मोदी म्हणाले. दहशतवाद हा मानवतेला सर्वात मोठा धोका असल्याचे भारत आणि टांझानियाचे मत आहे. त्यामुळेच दहशतवादविरोधी क्षेत्रातही सहकार्य वाढवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तत्पूर्वी, टांझानियाचे राष्ट्रपती सामिया सुलुहू हसन आज राष्ट्रपती भवनात पोहोचले. जिथे राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांचे स्वागत केले. राष्ट्रपती भवनात स्वागत समारंभानंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना टांझानियाचे राष्ट्रपती म्हणाले की,'दोन्ही देशांमध्ये अनेक दशकांपासून उत्तम संबंध आहेत. मला आशा आहे की या भेटीमुळे दोन्ही देशांमधील राजकीय आणि आर्थिक विकासाचे नवे आयाम खुले होतील. माझ्या देशाला आशा आहे की आपल्या पूर्वजांनी बांधलेले संबंध पुढील अनेक दशकांपर्यंत कायम राहतील. (हेही वाचा -Assembly Polls 2023 Date and Result: मध्यप्रदेश, छत्तीसगड, राजस्थान, मिझोरम आणि तेलंगणाच्या निवडणूक तारखा जाहीर; 3 डिसेंबर दिवशी मतमोजणी)

दरम्यान, झानियाच्या झांझिबारमध्ये आयआयटी मद्रास कॅम्पस सुरू करण्याची घोषणा आमच्या संबंधांमधील मैलाचा दगड असल्याचे पंतप्रधान मोदी म्हणाले. आम्ही संरक्षण क्षेत्रात पाच वर्षांच्या रोडमॅपवर सहमती दर्शवली आहे. या अंतर्गत लष्करी प्रशिक्षण, सागरी सहकार्य, क्षमता निर्माण आणि संरक्षण उद्योग या क्षेत्रात नवीन आयाम उघडतील. टांझानियाने ग्लोबल जैवइंधन अलायन्समध्ये सामील होण्याचा निर्णय घेतल्याचा मला आनंद आहे, असंही यावेळी पंतप्रधान मोदी यांनी नमूद केलं.

टांझानियाच्या राष्ट्रपती सामिया सुलुह हसन आपल्या चार दिवसांच्या दौऱ्यावर रविवारी भारतात पोहोचल्या. टांझानियाचे राष्ट्राध्यक्ष झाल्यानंतर त्यांचा हा पहिलाच भारत दौरा आहे. भारतात पोहोचल्यावर विमानतळावर केंद्रीय राज्यमंत्री अन्नपूर्णा देवी यांनी त्यांचे स्वागत केले. आज त्यांनी राष्ट्रपती भवनात राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. यानंतर टांझानियाच्या राष्ट्रपतींचे गार्ड ऑफ ऑनर देऊन औपचारिक स्वागत करण्यात आले.

तत्पूर्वी टांझानियाच्या राष्ट्रपतींनी राजघाटावर जाऊन महात्मा गांधींना आदरांजली वाहिली. पंतप्रधान मोदींसोबतच्या द्विपक्षीय बैठकीनंतर त्या संध्याकाळी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांची भेट घेतील आणि राष्ट्रपतींनी त्यांच्या सन्मानार्थ आयोजित केलेल्या डिनर कार्यक्रमातही सहभागी होतील. मंगळवारी, टांझानियाचे अध्यक्ष एका व्यवसाय आणि गुंतवणूक मंचाला उपस्थित राहतील.