Ola Starts Parcel Service: ओलाने सुरु केली पार्सल सेवा; कंपनीच्या इलेक्ट्रिक स्कूटरचा करण्यात येणार वापर
ओलाने प्रसारमाध्यमांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, येत्या काही दिवसांत ही सेवा देशातील विविध शहरांमध्ये सुरू केली जाईल.
Ola Starts Parcel Service: अॅप आधारित टॅक्सी सेवा देणारी कंपनी ओला आता पार्सल वितरण सेवेच्या (Ola Starts Parcel Service) व्यवसायात उतरली आहे. कंपनीने 6 ऑक्टोबर रोजीच आपली ओला पार्सल सेवा सुरू केली आहे. या सेवेसाठी ओला इलेक्ट्रिक स्कूटर (Electric Scooter) वापरण्यात येणार आहेत. सध्या ही सेवा बेंगळुरूमध्ये सुरू करण्यात आली आहे. काही काळापूर्वी कंपनीने बेंगळुरूमध्ये ओला बाइक लॉन्च केली होती, ज्या अंतर्गत इलेक्ट्रिक स्कूटर वापरल्या जात होत्या. ओला पार्सल लॉन्च झाल्याची बातमी कंपनीचे सह-संस्थापक आणि सीईओ भाविश अग्रवाल यांनी स्वतः ट्विटरवर शेअर केली आहे. त्यांनी लिहिले आहे की, आज ओला पार्सल बेंगळुरूमध्ये लॉन्च होत आहे. भारतासाठी सर्व इलेक्ट्रिक टू व्हीलर लॉजिस्टिक सिस्टम लाँच करण्यात येत आहे.
भाविश अग्रवाल यांनी ट्विटरवर लिहिले आहे की, ओला पार्सल सेवेअंतर्गत 5 किमीसाठी 25 रुपये, 10 किमीसाठी 50 रुपये, 15 किमीसाठी 75 रुपये आणि 20 किमीसाठी 100 रुपये आकारले जातील. ओलाने प्रसारमाध्यमांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, येत्या काही दिवसांत ही सेवा देशातील विविध शहरांमध्ये सुरू केली जाईल. सध्या, पोर्टर, स्विगी जिनी, उबेर आणि डंझो सारख्या कंपन्या शहरांतर्गत पार्सल वितरणाचे काम करतात. (हेही वाचा - OTT Platform दूरसंचार वाहिनी नसल्याने त्यांना सरकारी परवानगीची आवश्यकता नाही- TDSAT)
गेल्या वर्षी, ओलाचा सर्वात जवळचा प्रतिस्पर्धी उबेरने देखील पार्सल वितरणाची सुविधा सुरू केली. ज्याचे नाव उबेर कनेक्ट होते. कोलकाता, गुवाहाटी, जयपूर आणि गुडगाव या चार शहरांमध्ये उबर कनेक्ट सुरू करण्यात आले. मात्र, आता उबर कनेक्ट सेवा देशभरात उपलब्ध आहे. Uber ने Zypp इलेक्ट्रिक सोबत देखील भागीदारी केली आहे, ज्या अंतर्गत दिल्लीसाठी सुमारे 10 हजार इलेक्ट्रिक दुचाकी खरेदी केल्या जाणार आहेत.
ओला आपल्या व्यवसाय क्षेत्राचा झपाट्याने विस्तार करत आहे. सप्टेंबरमध्येच, ओला अन्न वितरण सेवा प्रदान करण्यासाठी सरकारच्या ONDC नेटवर्कमध्ये सामील झाली. अलीकडेच कंपनीने बेंगळुरूमध्ये ओला बाइक लाँच केली आहे. कंपनीचे सीईओ आणि संस्थापक भाविश अग्रवाल यांनी ट्विट करून ही माहिती दिली आहे. ओला बाईक राईडसाठी तुम्हाला किती पैसे द्यावे लागतील हेही त्यांनी ट्विटमध्ये सांगितले होते.
ट्विटमध्ये भाविशने लिहिले आहे की, 5 किलोमीटरसाठी ग्राहकांना 25 रुपये मोजावे लागतील, तर 10 किलोमीटरसाठी 50 रुपये मोजावे लागतील. त्यांनी पुढे लिहिले की हे अतिशय आरामदायक आणि स्वस्त आहे. शिवाय, ते पर्यावरणासाठी देखील चांगले आहे. येत्या काही महिन्यांत या सेवेचा देशभरात प्रसार करणार असल्याचे त्यांनी सांगितले आहे.