फटाक्यांच्या विक्रीला सर्वोच्च न्यायालयाची सशर्त परवानगी, दिवाळीत धूमधडाका कायम

दिवाळी सणाच्या पार्श्वभूमीवर फटाक्यांच्या विक्रीला सुप्रीम कोर्टाने मंगळवारी सशर्त परवानगी दिली

( Photo Credit: PTI )

दिवाळी हा रोषणाईचा सण म्हणून ओळखला जातो. देशभरात मोठ्या उत्साहात साजरा केल्या जाणार्‍या या सणामध्ये फटाक्यांचा मोठ्या प्रमाणात वापर केला जातो. वायू आणि ध्वनीप्रदूषणाला कारणीभूत ठरणार्‍या फटाक्यांच्या वापरावर बंदी घालण्यासाठी काहींनी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. आज या याचिकेवर सुनावणी करताना सर्वोच्च न्यायालयाने फटाक्यांवर संपूर्ण बंदी घालण्यास नकार दिला आहे. नक्की वाचा :  फटाके बंदीसाठी पाच वर्षाच्या या '3' चिमुकल्यांनी सर्वोच्च न्यायालायात मागितली होती दाद

काय आहे सर्वोच्च न्यायालयाचा निकाल ?

सुप्रीम कोर्टात न्यायाधीश ए. के सिकरी आणि अशोक भूषण यांच्या खंडपीठाने फटाकेबंदीच्या याचिकेवर निकाल दिला आहे. सर्वोच्च न्यायालयाने फटाक्यांवर संपूर्ण बंदी घातली नसली तरीही काही नियमांच्या अखत्यारितच फटाके उडवण्यास न्यायालयाने परवानगी मंजूर केली आहे.

फटाक्यांना सशर्त मंजूरी

फटाक्यांची ऑनलाईन माध्यमातून विक्री होणार नाही. परवानाधारकच फटाके विकू शकतात.

फटाके रात्री  8 -10 या वेळेतच वाजवले जाऊ शकतात.

पर्यावरणाला नुकसान होणार नाही अशा प्रकारचे फटाके वाजवण्यास न्यायलयाने परवानगी दिली आहे.

ख्रिस्मस आणि नववर्षाच्या रात्री 11:45 ते 12:45 या वेळेत फटाके उडवण्यास परवानगी देण्यात आली आहे.

मागील वर्षी दिल्ली आणि लगतच्या भागात फटाक्यांवर बंदी घालण्यात आली होती. फटाक्याच्या वापरामुळे होणारे ध्वनीप्रदूषण आणि वायूप्रदूषण अनेक आजारांना कारणीभूत ठरत आहे. प्रामुख्याने श्वसनाचे विकार, फुफ्फुसांचे आजार जडण्याचे प्रमाण वाढल्याने फटाक्यावरील बंदीसाठी विशेष प्रयत्न केले जात होते.

फटाक्यांवरील बंदीमुळे लाखो लोकांचा रोजगार हिरावला जाईल. प्रदूषणासाठी फक्त फटाकेच कारणीभूत ठरत नाही, असा युक्तिवाद फटाके विक्रेते आणि निर्मात्यांनी न्यायालयात केला आहे.