पाच हजार कोटींचा घोटाळा: आणखी एका गुजराती व्यापाऱ्याचा देशाबाहेर पोबारा
ईडी आणि सीबीआय सूत्रांच्या हवाल्याने प्रसारमाध्यमांनी दिलेल्या माहतीनुसार, स्वत: नितीन त्याचा भाऊ चेतन संदेसरा, वहीणी दीप्तिबेन संदेसरा आणि कुटुंबातील इतर सदस्य नायजेरीयात लपल्याचे म्हटले आहे.
तब्बल पाच हजार कोटी रुपयांचा बँक घोटाळा करुन विदेशात पळालेला गुजराती व्यापारी नितीन संदेसरा पुन्हा एकदा पळाल्याचे वृत्त आहे. सुरुवातीला तो दुबईमध्ये असल्याचे वृत्त होते. मात्र, आता तो नायजेरियाला पळाल्याचे बोलले जात आहे. ईडी आणि सीबीआय सूत्रांच्या हवाल्याने प्रसारमाध्यमांनी दिलेल्या माहतीनुसार, स्वत: नितीन त्याचा भाऊ चेतन संदेसरा, वहीणी दीप्तिबेन संदेसरा आणि कुटुंबातील इतर सदस्य नायजेरीयात लपल्याचे म्हटले आहे. भारत आणि नायजेरीया यांच्यात गुन्हेगार प्रत्यर्पणाचा करार नाही. त्यामुळे अफ्रिकी देशातून नितीनला भारतात आणणे कठीण असल्याची चर्चा आहे.
एका अधिकाऱ्याच्या हवाल्याने प्रसारमाध्यमांनी वृत्त दिले होते की, ऑगस्ट महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात नितीनला दुबईतील यूएई अथॉरिटीमधून ताब्यात घेण्यात आले. मात्र, त्या वृत्तात तथ्य नव्हते. त्यानंतर तो आपल्या कुटुंबासोबत आणि काही इतर लोकांसोबत नायजेरियाला पळाला. दरम्यान, तपास यंत्रणांनी यूएआय ऑथेरिटीसोबत संदेसराचा ताबा मिळावा यासाठी निवेदन देण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच, संदेसरा कुटुंबियांविरोधात रेड कॉर्नर नोटीस जारी करण्याचाही यंत्रणांचा विचार आहे. दरम्यान, अद्याप हे समजू शकले नाही की, संदेसरा कुटुंबिय नायजेरियामध्ये भारताच्या पासपोर्टवरती राहत आहे की, अन्य कोणत्या देशाच्या.
दरम्यान, सीबीआय आणि ईडीने वडोदरा येथील स्टर्लिंग बायोटेकशी संबंधीत उच्चपदस्थ नितीन, चेतन आणि दीप्ति संदेसरा, राजभूषण ओमप्रकाश दीक्षित, विलास जोशी, चार्टर्ड अकाऊंटंट हेमंत हठी, आंध्र बँकेचे माजी संचालक अनूप गर्ग आणि इतर काही मंडळींविरोदात गुन्हा दाखल केला आहे.