World's Fastest Growing Religion: भारतामध्ये 2050 पर्यंत असेल जगातील सर्वाधिक मुस्लिम लोकसंख्या; हिंदू ठरेल जगातील तिसरा सर्वात मोठा धर्म- Pew Report
असे असूनही, हिंदू धर्माचे पालन करणारे लोक भारतात बहुसंख्य राहतील. सध्या, इंडोनेशिया हा सर्वात मोठा मुस्लिम लोकसंख्या असलेला देश आहे जिथे सुमारे 25 कोटी मुस्लिम राहतात.
World's Fastest Growing Religion: भारत (India) हा हिंदू (Hindu) बहुसंख्य देश म्हणून जगभरात ओळखला जातो, जेथे सर्व धर्माचे लोक एकत्र राहतात. भारतीय राज्यघटनेने प्रत्येकाला त्यांच्या धर्माचे पालन करण्याचे पूर्ण स्वातंत्र्य दिले आहे. जगभरातील विविध संस्था वेळोवेळी धर्माबाबत संशोधन करत असतात आणि काही अंदाज किंवा तथ्ये आपल्यासमोर आणत असतात. अशीच एक संस्था म्हणजे प्यू रिसर्च इन्स्टिट्यूट (Pew Report). प्यू रिसर्चच्या नवीन अभ्यासानुसार, 2050 पर्यंत हिंदू धर्म जगातील तिसरा सर्वात मोठा धर्म बनेल. अमेरिकन थिंक टँक प्यू रिसर्च सेंटरच्या मते दैनिक भास्करमध्ये प्रसिद्ध झालेल्या बातमीनुसार, 2050 सालापर्यंत भारत सर्वाधिक मुस्लिम लोकसंख्या असलेला देश म्हणून इंडोनेशियाला मागे टाकेल.
भारतात जगातील सर्वाधिक मुस्लिम लोकसंख्या 30 कोटींवर पोहोचेल. असे असूनही, हिंदू धर्माचे पालन करणारे लोक भारतात बहुसंख्य राहतील. सध्या, इंडोनेशिया हा सर्वात मोठा मुस्लिम लोकसंख्या असलेला देश आहे जिथे सुमारे 25 कोटी मुस्लिम राहतात. अहवालात म्हटले आहे की, 2010 मध्ये जगात 1.6 अब्ज मुस्लिम आणि 2.17 अब्ज ख्रिश्चन होते. जर दोन्ही धर्म त्यांच्या सध्याच्या वाढीच्या दराने वाढत राहिले, तर 2070 पर्यंत इस्लामच्या अनुयायांची संख्या ख्रिश्चनांपेक्षा जास्त असेल. हिंदू धर्माचे अनुयायी तिसऱ्या क्रमांकावर असतील.
अहवालानुसार अमेरिकेतही मुस्लिम लोकसंख्या वाढणार आहे. सध्या अमेरिकेत मुस्लिमांची लोकसंख्या सुमारे 1 टक्के आहे आणि 2050 पर्यंत ती 2.1 टक्के होईल असा अंदाज आहे. द फ्युचर ऑफ वर्ल्ड रिलिजन्स अहवालात असे म्हटले आहे की, जगाची लोकसंख्या 2050 पर्यंत 35 टक्के दराने वाढेल. जर सध्याचा विकास दर 2050 च्या पुढे चालू राहिला तर 2070 पर्यंत जगातील बहुसंख्य लोक मुस्लिम असतील. अभ्यासानुसार 2050 पर्यंत भारताच्या लोकसंख्येमध्ये हिंदू बहुसंख्य असतील (77%) आणि मुस्लिम हे सर्वात मोठे अल्पसंख्याक (18%) असतील. (हेही वाचा: Rajasthan International Pushkar Fair: यंदा 2 ते 17 नोव्हेंबरदरम्यान आयोजित केला जाणार आंतरराष्ट्रीय पुष्कर मेळा; मिळणार राजस्थानची संस्कृती जवळून पाहण्याची संधी)
भारतात अल्पसंख्याक मुस्लिमांची संख्या वाढेल, तर काही मुस्लिम बहुसंख्य देशांमध्ये हिंदूंची संख्या कमी होईल. कमी प्रजनन दर, धर्मांतर आणि स्थलांतर यांसारख्या कारणांमुळे 2050 मध्ये अनेक देशांमध्ये हिंदूंची लोकसंख्या कमी होईल. अहवालानुसार, 2010 मध्ये पाकिस्तानमध्ये हिंदूंची संख्या 1.6% होती, जी 2050 पर्यंत केवळ 1.3% पर्यंत खाली येईल. बांगलादेशातही अशीच परिस्थिती निर्माण होणार आहे, जिथे 2010 मध्ये हिंदूंची संख्या 8.5 टक्के होती, ती 2050 पर्यंत केवळ 7.2 टक्के इतकी कमी होऊ शकते. तर अफगाणिस्तानातील परिस्थिती आणखीनच बिकट होणार आहे. संशोधनानुसार, 2010 मध्ये इस्लामिक देशांमध्ये 0.4 टक्के हिंदू होते, हे प्रमाण लवकरच 0.3 टक्क्यांपर्यंत घसरणार आहे.