Vijay Mallya Offers Settlement Package: विजय मल्ल्या बँकांशी सेटलमेंट करण्यास तयार; दाखवली 13,960 कोटी रुपये देण्याची तयारी

याद्वारे तो बँकेच्या 13,960 कोटींची परतफेड करण्यास राजी आहे. विजय मल्ल्याच्या वकिलांनी सर्वोच्च न्यायालयात हे सांगितले आहे.

विजय मल्ल्या | (Photo Credits: PTI/File)

अनेक बँकांकडून हजारो कोटी रुपयांचे कर्ज घेऊन लंडनमध्ये पळून गेलेला, फरार दारू व्यावसायिका विजय मल्ल्या (Vijay Mallya) आता सेटलमेंट (Settlement) करण्यास तयार झाला आहे. याद्वारे तो बँकेच्या 13,960 कोटींची परतफेड करण्यास राजी आहे. विजय मल्ल्याच्या वकिलांनी सर्वोच्च न्यायालयात हे सांगितले आहे. विजय मल्ल्याकडे स्वतःला वाचवण्याचा आता कोणताही मार्ग शिल्लक नाही आणि सरकारने हे पॅकेज स्वीकारणे, हाच मल्ल्या समोरील शेवटचा पर्याय असू शकेल. विजय मल्ल्याकडे भारताकडे होणारे प्रत्यार्पण टाळण्यासाठी कायदेशीर मार्ग शिल्लक नाही. हे सेटलमेंट पॅकेज त्याच्यासाठी आशेचा शेवटचा किरण आहे. गेल्या महिन्यात, विजय मल्ल्या प्रत्यर्पण विरोधात खटला हरला होता आणि आता त्याला पुन्हा ब्रिटिश सर्वोच्च न्यायालयात अपील करण्यास नकार देण्यात आला आहे.

टाईम्स ऑफ इंडियाच्या वृत्तानुसार विजय मल्ल्याच्या वकिलांनी सर्वोच्च न्यायालयात सांगितले की, मल्ल्याने बँकांना सर्वसमावेशक सेटलमेंट पॅकेज देण्याचे आश्वासन दिले आहे. यामध्ये हे सेटलमेंट पॅकेज किती आहे हे वकिलांनी सांगितले नाही. परंतु गेल्या महिन्यात दाखल केलेल्या याचिकेत त्यांनी, 13,960 कोटींच्या सेटलमेंट पॅकेजबाबत उल्लेख केला आहे. विजय मल्ल्याने प्रस्तावित केलेली ही रक्कम आतापर्यंतची सर्वाधिक आहे. यापूर्वी त्याने 9000 कोटी रुपयांची ऑफर दिली होती. (हेही वाचा: कर्जाची 100% परतफेड करण्यास तयार, कृपया स्वीकार करा: विजय मल्ल्या)

स्टेट बँक ऑफ इंडियाच्या नेतृत्वात असलेल्या 13 बँकांच्या संघटनेने फरार दारू व्यावसायिका विजय मल्ल्याविरूद्ध लंडन हायकोर्टात म्हटले होते की, मल्ल्याचा 9,834 कोटी रुपये परतफेड करण्याचा प्रस्ताव मूर्खपणाचा आहे. विजय मल्ल्याकडे देशातील बँकांचे जवळपास 9000 कोटी रुपयांचे कर्ज आहे आणि विजय मल्ल्या मार्च 2016 मध्ये पैसे न देता देशाबाहेर पळून गेला. त्यानंतर विजय मल्ल्याला फरारी घोषित करण्यात आले असून, याबाबत लंडनच्या कोर्टात खटला चालू आहे. या व्यतिरिक्त अनेक भारतीय एजन्सींनी त्याला मनी लाँड्रिंग आणि पैशाच्या फसवणूकीसह अनेक डीफॉल्ट प्रकरणांमध्ये दोषी ठरवले आहे.