पीएम नरेंद्र मोदींनी देशाला संबोधित केलेल्या भाषणाचा व्हिडिओ मराठीसह अनेक भाषांमध्ये जारी; भोजपुरी, पंजाबी, बांगला, कन्नड, गुजराती ई. भाषांमध्ये केले ट्वीट
आज, मंगळवारी पुन्हा पंतप्रधानांनी देशाला संबोधित केले.
देशात कोरोना विषाणू (Coronavirus) महामारी आणि त्यानंतर लॉक डाऊन (Lockdown) सुरु झाल्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी वेळोवेळी जनतेशी संवाद साधून लोकांना धीर दिला आहे. आज, मंगळवारी पुन्हा पंतप्रधानांनी देशाला संबोधित केले. आपल्या भाषणात पंतप्रधानांनी 'पंतप्रधान गरीब कल्याण अन्न योजने'त (Pradhan Mantri Gareeb Kalyan Ann Yojana) नोव्हेंबरपर्यंत पाच महिन्यांची मुदतवाढ देण्याची घोषणा केली. या योजनेचा 80 कोटी लोकांना फायदा होईल आणि पुढील पाच महिन्यांपर्यंत ही योजना सुरू ठेवण्यासाठी 90 हजार कोटी रुपये खर्च येणार असल्याचे पंतप्रधान आपल्या भाषणात म्हणाले. आता पंतप्रधान मोदींचे हे भाषण मराठीसह 16 प्रादेशिक भाषांमध्ये जारी करण्यात आले आहे.
पीएम मोदी यांनी याबाबत ट्वीट करून, हे प्रादेशिक भाषेमधील व्हिडिओ शेअर केले आहेत. जेणेकरून ज्या लोकांनी पंतप्रधानांचे हिंदीमधील भाषण पहिले नसेल असे लोक आपल्या भाषेमध्ये हे भाषण ऐकू शकतील. पीएम मोदी यांनी मराठी व्यतिरिक्त तेलगू, तामिळ, आसामी, भोजपुरी, पंजाबी, बांगला, कन्नड, गुजराती, लडाखी, उडिया, मल्याळम, मैथिली, काश्मिरी, मणिपुरी आदी भाषांमध्ये ट्विट करुन देशवासियांना ही माहिती दिली आहे. प्रादेशिक दूरदर्शन वाहिन्यांवर पंतप्रधानांची महत्त्वाची भाषणे दाखवली जातात. (हेही वाचा: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची मोठी घोषणा; नोव्हेंबरपर्यंत लागू असेल ‘प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजना’)
महत्वाचे म्हणजे हे प्रत्येक व्हिडिओ शेअर करताना, त्या-त्या भाषेतून आजच्या भाषणाबद्दल माहिती देण्यात आली आहे. मराठी व्हिडिओ शेअर करताना पंतप्रधान लिहितात, ‘गरीबांना आत्मसन्मान मिळवून दिला. पंतप्रधान गरीब कल्याण अन्न योजनेच्या मुदतीत वाढ केल्याने संपूर्ण देशातील कोट्यवधी गरीबांना लाभ मिळेल.’
दरम्यान, आजच्या भाषणामध्ये पंतप्रधान मोदींनी या महामारीच्या काळात सरकारने गरीब जनतेसाठी सुरु केलेल्या योजनांबद्दल माहिती दिली. तसेच ‘आत्मनिर्भर भारत’, ‘व्होकल फॉर लोकल’चा उल्लेख करीत यासाठी सर्वांनी एकत्र येऊन काम करावे असे सांगितले. या सोबतच सर्वांनी स्वतःची काळजी घ्यावी, सामाजिक अंतराचे पालन करावे, मास्कचा वापर करावा असे आवाहन त्यांनी नागरिकांना केले.