Vande Bharat Sleeper Trains: या वर्षाच्या अखेरीस रुळावर धावणार स्लीपर कोच असलेली वंदे भारत ट्रेन; Secunderabad-Pune मार्गावर धावण्याची शक्यता

वंदे भारत ट्रेन्स या सेमी-हाय-स्पीड ट्रेन सेवांची संख्या वाढवण्याच्या मोठ्या उपक्रमाचा एक भाग आहे.

Vande Bharat Trains (संग्रहित संपादित प्रतिमा)

Vande Bharat Sleeper Trains: तुम्ही जर ट्रेनने प्रवास करत असाल तर तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे. भारतीय रेल्वे यावर्षी वंदे भारत स्लीपर ट्रेन (Vande Bharat Sleeper Trains) सुरू करण्याच्या तयारीत आहे. या गाड्यांमध्ये प्रवाशांसाठी अधिक सुविधांचा समावेश असेल. मिळालेल्या माहितीनुसार, स्लीपर कोच असलेली पहिली वंदे भारत ट्रेन सिकंदराबाद ते पुणे (Secunderabad-Pune) दरम्यान धावू शकते. अशा वंदे भारत गाड्यांमुळे लांब पल्ल्याचा प्रवास सोयीस्कर होईल आणि प्रवाशी आपल्या गंतव्यस्थानी लवकर पोहोचू शकतील.

अहवालानुसार, भारत अर्थ मूव्हर्स लिमिटेड (BEML) आणि इंटिग्रल कोच फॅक्टरी (ICF) वंदे भारतचे स्लीपर कोच तयार करत आहेत. या वर्षाच्या अखेरीस हे लॉन्च केले जाणार आहेत.

या स्लीपर गाड्यांमधील आधुनिक वैशिष्ट्यांमध्ये सेन्सर-आधारित लाइटिंग, उत्तम ध्वनीरोधक, स्वयंचलित दरवाजे आणि प्रत्येक डब्यात लहान पँट्री यांचा समावेश असेल. यामध्ये व्हीलचेअर-ॲक्सेसिबल स्लीपर, आरामदायी बंक बेड आणि अँटी-स्पिल वॉश बेसिन आणि वास नियंत्रण प्रणाली असलेले स्नानगृह देखील असतील.

भारतीय रेल्वे प्रवाशांच्या सोयी-सुविधा सुधारण्यासाठी आणि प्रवासाचा वेळ कमी करण्यासाठी देशभरात विविध प्रकारच्या ट्रेन्स ऑफर करते. वंदे भारत ट्रेन्स या सेमी-हाय-स्पीड ट्रेन सेवांची संख्या वाढवण्याच्या मोठ्या उपक्रमाचा एक भाग आहे. सिकंदराबाद-पुणे ही नवीन स्लीपर ट्रेन सेवा, वंदे भारत ताफ्याचे आधुनिकीकरण आणि विस्तार करण्याच्या मोठ्या योजनेचा एक भाग आहे, ज्यामुळे लांब पल्ल्याच्या प्रवाशांना आरामदायी प्रवास मिळेल. (हेही वाचा: Bomb Threat Call Targeting Vistara Flight: दिल्लीहून येणाऱ्या विस्तारा फ्लाइट UK611 ला बॉम्बने उडवण्याची धमकी)

याच मार्गावर, सध्या शताब्दी एक्स्प्रेस चालवली जाते, जिचा प्रवास वेळ सुमारे 8 तास 25 मिनिटे आहे. सिकंदराबाद-पुणे वंदे भारत स्लीपरद्वारे प्रवासी त्यांच्या गंतव्यस्थानी किमान एक तास आधी पोहोचतील. सिकंदराबाद-पुणे वंदे भारत स्लीपर ट्रेनचे वेळापत्रक आणि थांबे अद्याप निश्चित करण्यात आलेले नाहीत.  रेल्वे सध्या बहुप्रतिक्षित वंदे भारत स्लीपर ट्रेन लॉन्च करण्याच्या तयारीला अंतिम रूप देत आहे. त्याचे उद्घाटन होताच पूर्ण वेळापत्रक जाहीर केले जाईल, असे अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे.