Uttarakhand Tragedy: उत्तराखंड दुर्घटनेनंतर 18 व्या दिवशीही शोध व बचावकार्य सुरु; आतापर्यंत 70 मृतदेह सापडले, 130 पेक्षा जास्त लोक अजूनही Missing
एनटीपीसीने या सर्व लोकांच्या कुटुंबियांना प्रत्येकी 20 लाख नुकसान भरपाई जाहीर केली आहे. अनेक कुटुंबांना ही नुकसानभरपाई देण्यातही आली आहे
उत्तराखंडच्या चमोली जिल्ह्यातील ग्लेशियर बर्स्ट दुर्घटनेनंतर बुधवारी 18 व्या दिवशीही शोध आणि बचाव कार्य सुरूच आहे. आपत्तीनंतर आतापर्यंत 70 मृतदेह काढण्यात यश आले आहे. पोलिसांनी दिलेल्या बुलेटिनमध्ये ही माहिती देण्यात आली आहे. चमोली पोलिसांनी प्रसिद्ध केलेल्या माध्यम बुलेटिनमध्ये सांगितल्या प्रमाणे, आपत्तीग्रस्त भागातून आतापर्यंत 70 मृतदेह आणि 29 मानवी अवयव हाती लागले आहेत. त्यापैकी 40 मृतदेह आणि एका मानवी अवयवाची ओळख पातळी आहे. याशिवाय मंगळवारी जोशीमठ पोलिस ठाण्यात आणखी एका बेपत्ता व्यक्तीबाबत रिपोर्ट करण्यात आला.
तपोवन-विष्णुगड जलविद्युत प्रकल्पात काम करणार्या ऋत्विक कंपनीने आपला एक कामगार बेपत्ता झाल्याची माहिती पोलिस ठाण्यात दिली आहे. या दुर्घटनेनंतर, 134 लोक अद्याप बेपत्ता आहेत, ज्यांचा अजूनही शोध चालू आहे. बुलेटिनमध्ये म्हटले आहे की, 58 मृतदेह, 28 मानवी अवयव आणि आपत्तीत बळी पडलेल्या लोकांच्या 110 कुटुंबांचे डीएनए नमुने जुळण्यासाठी देहरादून येथील न्यायवैद्यक प्रयोगशाळेत पाठविण्यात आले आहेत.
7 फेब्रुवारी रोजी चमोली आपत्तीत हरवलेल्या लोकांच्या शोधासाठी, चमोलीच्या ऋषीगंगा आणि धौलीगंगा घाटी तसेच तपोवन बोगदा आणि बॅरेज साइटमध्ये गेल्या 18 दिवसांपासून शोधकार्य अविरत सुरू आहे. आता या हरवलेल्या 134 जणांना मृत घोषित करण्यासाठी सरकारने एक अधिसूचना जारी केली आहे. केंद्राकडून मिळालेल्या निर्देशानंतर उत्तराखंड सरकारने हे पाऊल उचलले आहे. (हेही वाचा: कोरोना व्हायरसच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे विमानतळावर येणाऱ्या प्रवाशांसाठी नव्या मार्गदर्शक सुचना, राज्यांनुसार जाणून घ्या काय असणार नियम)
चमोली हिमकडा अपघातात एनटीपीसीच्या तपोवन येथे असलेल्या वीज प्रकल्पातील 140 जण प्रभावित झाले आहेत. एनटीपीसीने या सर्व लोकांच्या कुटुंबियांना प्रत्येकी 20 लाख नुकसान भरपाई जाहीर केली आहे. अनेक कुटुंबांना ही नुकसानभरपाई देण्यातही आली आहे. याशिवाय राज्य सरकारने 4 लाख रुपये आणि केंद्राने पंतप्रधान मदत निधीतून दोन लाख रुपये जाहीर केले आहेत.