उत्तर प्रदेश: बुलंदशहर येथे मोबाईल चार्जरचा शॉक लागून अडीच वर्षीय मुलाचा मृत्यू

मोबाईलचा चार्जर तोंडात घातल्याने शॉक लागून एका अडीच वर्षीय मुलाचा मृत्यू झाल्याची घटना उत्तर प्रदेशातील बुलंदशहर येथे घडली आहे.

Representational Image (Photo Credits: ANI)

मोबाईलचा चार्जर तोंडात घातल्याने शॉक लागून एका अडीच वर्षीय मुलाचा मृत्यू झाल्याची घटना उत्तर प्रदेशातील (Uttar Pradesh) बुलंदशहर (Bulandshahr) येथे घडली आहे. सहवर असं या चिमुकल्याचं नाव आहे. चार्जिंगला लावलेला मोबाईल काढला मात्र चार्जरचं बटण बंद करायचे राहिल्याने ही दुर्घटना घडली.

रझिया ही महिला इफ्तारसाठी जहांगिरीबाद येथे आपल्या माहेरी आली होती. शनिवारी घरातील कोणीतरी आपला मोबाईल चार्जिंगला लावला होता. काही वेळा मोबाईल चार्जरमधून काढला. मात्र चार्जरचे बटण बंद करायचे राहून गेले. खेळत असलेल्या सहवर याने चार्जरचे वायरचे टोक तोंडात घातले आणि त्याला शॉक लागला. यात सहवर याचा मृत्यू झाला. (वसई-विरार महानगरपालिकेच्या स्विमिंग पूलमध्ये बुडून चिमुकल्याचा मृत्यू; प्रशिक्षकासह चार जण अटकेत)

या प्रकरणी कुटुंबातील कोणीही पोलिस स्थानकात गुन्हाची नोंद केली नाही. तक्रार नोंदवल्यास नक्कीच कारवाई केली जाईल, अशी माहिती जहांगिराबाद पोलिसांनी दिली आहे.