Uttar Pradesh Assembly Elections: प्रियंका गांधी यांची मोठी घोषणा- 'उत्तर प्रदेशमध्ये कॉंग्रेसचे सरकार आल्यास मुलींना देणार स्कूटी आणि स्मार्टफोन'

आगामी निवडणुकांमध्ये कॉंग्रेसची लढत भाजप आणि सपा यांच्याशी होणार आहे

Priyanka Gandhi (Photo Credits-Twitter)

उत्तर प्रदेशात (Uttar Pradesh) काही महिन्यांत विधानसभा निवडणुका (Assembly Elections) होणार आहेत. या पार्श्वभूमीवर सर्व राजकीय पक्षांनी समाजातील सर्व घटकांपर्यंत पोहोचण्याची तयारी सुरू केली आहे. सोबतच विविध राजकीय पक्ष जनतेला आकर्षित करण्यासाठी अनेक आश्वासने देत आहेत. काँग्रेसच्या (Congress) सरचिटणीस आणि उत्तर प्रदेशच्या प्रभारी प्रियंका गांधी (Priyanka Gandhi-Vadra) यांनी जाहीर केले आहे की, राज्यात काँग्रेसचे सरकार स्थापन झाल्यास त्यांचे सरकार महिलांना स्कूटी आणि स्मार्टफोन देईल. याआधी काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियंका गांधी यांनी 40 टक्के तिकिटे महिलांना देण्यात येतील अशी घोषणा होती.

आजच्या या मोठ्या घोषणेनंतर असे मानले जाते की प्रियंका गांधी महिलांवर अधिक लक्ष केंद्रित करत आहेत. आज सकाळी काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियंका गांधींनी त्यांच्या अधिकृत ट्विटर हँडलवर सांगितले की, ‘काल मी काही मुलींना भेटले आणि त्यांनी सांगितले की त्यांना अभ्यास आणि सुरक्षिततेसाठी स्मार्टफोनची गरज आहे. आज मला आनंद आहे की, घोषणा समितीच्या संमतीने यूपी काँग्रेसने राज्यात कॉंग्रेस सरकार स्थापन झाल्यानंतर इंटर पास मुलींना स्मार्टफोन आणि पदवीधर मुलींना इलेक्ट्रॉनिक स्कूटी देण्याचा निर्णय घेतला आहे.’

याआधी प्रियंका गांधी यांनी सांगितले होते की, ज्या महिलांना व्यवस्थेत बदल घडवायचा आहे त्यांनी पुढे येऊन निवडणूक लढवाव्यात, त्यांचे स्वागत आहे. प्रियंका एका पत्रकार परिषदेत म्हणाल्या होत्या की, निवडणूक लढवण्याची इच्छा असणाऱ्या महिला 15 नोव्हेंबरपर्यंत अर्ज करू शकतात. (हेही वाचा: प्रियंका गांधी यांचा मास्टरस्ट्रोक, उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीत काँग्रेस पक्षाकडून महिलांना 40% उमेदवारी)

दरम्यान, पक्ष 1989 पासून राज्यात सत्तेबाहेर आहे आणि राज्याच्या राजकारणात आपली उपस्थिती दर्शवण्याचा प्रयत्न करत आहे. आगामी निवडणुकांमध्ये कॉंग्रेसची लढत भाजप आणि सपा यांच्याशी होणार आहे. पक्षाची सूत्रे सांगतात की, अशी आश्वासने देऊन पक्ष लोकांचे लक्ष वेधून घेण्यास यशस्वी ठरू शकतो,  ज्यामुळे येत्या निवडणुकीत चांगले परिणाम दिसून येतील.