CoWIN Portal द्वारे 'या' कारणांनी होत आहेत युजर्स ब्लॉक; अकाऊंट कसे कराल Unblock? जाणून घ्या
आता मात्र या अॅपद्वारे नागरिकांना ब्लॉक केले जात असल्याचे पाहायला मिळत आहेत.
कोविड-19 लसीकरणासाठी (COVID-19 Vaccination) उपलब्ध असलेला कोविन पोर्टल (CoWIN Portal) बद्दल सुरुवातीपासूनच नागरिकांकडून तक्रारीचा सूर ऐकू येत आहे. आता मात्र या अॅपद्वारे नागरिकांना ब्लॉक केले जात असल्याचे पाहायला मिळत आहेत. वारंवार स्लॉट बुकिंगसाठी सर्च केल्याने (Excessive Search for COVID-19 Vaccination Slots) आणि ओटीपी जनरेट केल्याने (OTP Generation) कोविन अॅप युजर्संना ब्लॉक करत आहे, असे रिपोर्टमधून समोर आले आहे. "वारंवार सर्च केल्यामुळे तुमचे अकाऊंट ब्लॉक करण्यात आले आहे. आमच्या अटी आणि शर्थी वाचा," असा मेसेज ब्लॉक करण्यात आलेल्या व्यक्तीला अॅपद्वारे दिला जात आहे.
टाईम्स ऑफ इंडियाच्या रिपोर्टनुसार, लसीच्या स्लॉट बुकिंसाठी 24 तासांत 1000 वेळा सर्च केलेल्या किंवा 50 पेक्षा अधिक वेळा ओटीपी जनरेट केलेल्या युजर्संना ब्लॉक करण्यात येत आहे. त्याचबरोबर 15 मिनिटांच्या कालावधीत 20 पेक्षा अधिक वेळा स्लॉट बुकिंग सर्च करणाऱ्या युजरला देखील ब्लॉक करण्यात येत आहे. आतापर्यंत देशभरातील कमीत कमी 6000 युजर्संना अॅपद्वारे ब्लॉक करण्यात आले आहे. (CoWin च्या नावाने बनावट App सह लिंक व्हायरल, सावध व्हा नाहीतर बँक खाते होईल रिकामे)
अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, जर एखादी व्यक्ती 15 मिनिटांच्या कालावधीत 20 पेक्षा अधिक वेळा स्लॉटसाठी सर्च करत असेल तर काहीतरी गडबड आहे. स्लॉट बुकिंग कोणत्याही कम्प्युटराईज बॉटकडून होत नसून व्यक्तीकडूनच होत आहे, याची खात्री करण्यासाठी हे बंधन घालण्यात आले आहे. अधिक वेळा सर्च करणाऱ्या युजर्संना ब्लॉक करण्यात येऊ शकते. दरम्यान, अशाप्रकारच्या बॉटला आळा घालण्यासाठी किती वेळा सर्च केला याचा रेकॉर्ड ठेवण्यात येतो, असेही त्यांनी सांगितले.
कोविन अॅपद्वारे ब्लॉक झाल्यास काय कराल?
कोविन पोर्टलद्वारे ब्लॉक झाल्यास अॅपच्या सपोर्ट टीमकडून तुम्हाला फोन येईल. अॅपमध्ये तुमच्याद्वारा झालेल्या अॅक्टीव्हीटीबाबत तुम्हाला अलर्ट केले जाईल. तसंच सिस्टमद्वारे तुम्ही अॅपमधून लॉग आऊट व्हाल आणि कोविड-19 लसीकरणासाठी स्लॉट बुकिंग करु शकणार नाही.
कोविन अकाऊंट अनब्लॉक कसे कराल?
जर कोविन अकाऊंट ब्लॉक झाले असेल तर ते अनब्लॉक करण्यासाठी पुढील 24 तासांत कोणत्याही प्रकारचे सर्च किंवा ओटीपी जनरेशन करु नका. तसंच तुम्ही 1075 या क्रमांकावर कॉल करुन मदत मागू शकता.
कोरोनाचा धोका टाळण्यासाठी लसीकरण वेळेत व्हावे, असे प्रत्येकाला वाटत आहे. मात्र कोविन अॅपद्वारे रजिस्ट्रेशन करताना नियमांचे पालन करणे देखील तितकेच आवश्यक आहे.