UPSC Cancels Puja Khedkar's Candidature: यूपीएससी कडून पूजा खेडकर वर मोठी कारवाई; IAS पद गेलं, भविष्यातही परीक्षा देण्यावर बंदी!
दिल्ली पोलिस पूजा विरोधात कारवाई करण्याची शक्यता आहे.
यूपीएससी (UPSC) कडून आज (31 जुलै) प्रशिक्षणार्थी असलेल्या पूजा खेडकरचं Provisional Candidature आज रद्द करण्यात आल्याची माहिती दिली आहे. त्यामुळे पूजा खेडकरने आपलं आयएएस हे पद गमावलं आहे. दरम्यान पूजाला आता भविष्यात यूपीएससी च्या परीक्षा देण्यापासूनही दूर केले आहे. पूजा खेडकर हिच्यावर नागरी सेवा परीक्षेत उमेदवारी मिळवण्यासाठी अपंगत्व आणि इतर मागासवर्गीय (Non-Creamy Layer) कोट्याचा गैरवापर केल्याचा आरोप आहे. पूजा खेडकरची पात्रता आणि तिच्या अर्जाभोवतीच्या परिस्थितीचा तपशीलवार आढावा घेतल्यानंतर UPSC कडून अखेर आज घोषणा करण्यात आली आहे.
यूपीएससी कडून जारी निवेदनामध्ये दिलेल्या माहितीनुसार, "UPSC ने उपलब्ध नोंदी काळजीपूर्वक तपासल्या आहेत आणि CSE-2022 नियमांच्या तरतुदींचे उल्लंघन केल्याबद्दल पूजा खेडकर दोषी आढळली आहे. CSE-2022 साठी तिची तात्पुरती उमेदवारी रद्द करण्यात आली आहे आणि तिला भविष्यातील सर्व परीक्षांमधून कायमचे काढून टाकण्यात आले आहे." नक्की वाचा: UPSC to Revamp Exam System: पूजा खेडकर प्रकरणानंतर यूपीएससीचा मोठा निर्णय; परीक्षा पद्धतीत होणार अनेक मोठे बदल, जाणून घ्या सविस्तर .
अटकेची टांगती तलवार
दरम्यान पूजा खेडकर वर आता अटकेची टांगती तलवार आहे. दिल्ली पोलिस पूजा विरोधात कारवाई करण्याची शक्यता आहे. आज दिल्लीच्या कोर्टात सुनावणी दरम्यान पुण्याचे जिल्हाधिकारी सुहास दिवसे यांच्या सांगण्यावरुन गुन्हा दाखल झाला. सुहास दिवसे यांच्याविरुद्ध पूजाने लैंगिक छळाची तक्रार दाखल केली होती त्यामधून तिला टार्गेट करण्यात आले असा दावा करण्यात आला आहे. सुहास दिवसे यांनी पूजाला त्यांच्या खोलीत यायला सांगितल होते. मात्र, पूजाने त्याला नकार दिल्याचं तिच्या वकिलांनी आज कोर्टात म्हटलं आहे.
"माझ्यावर गुन्हा दाखल होताच मीडीया कडून माझ्याविरोधात मोहीम सुरु झाली. मी मीडीयात बोलायला कधीच गेले नव्हते. कारण माझा न्यायव्यवस्थेवर विश्वास आहे, असेही पूजा खेडकरने वकिलांमार्फत न्यायालयात सांगितले आहे.