UP Shocker: पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेमध्ये पाहिल्यानंतर जिवंत जाळले; आरोपी पतीला अटक
सुरुवातीला या महिलेची हत्या तिच्या प्रियकरानेच केल्याचे त्याचे म्हणणे होते. दुसरीकडे महिलेचे माहेरचे लोक याबाबत पतीला दोष देत राहिले.
विवाहबाह्य संबंध (Extramarital Affairs) हे नेहमीच नात्यात कटुता आणतात. याचे होणारे परिणाम माहित असूनही आपल्या जोडीदाराला फसवून लोक अशा नात्यात अडकतात आणि शक्यतो याचा अंत सुखकारक नसतो. आता उत्तर प्रदेशच्या बरेलीमध्ये (Bareilly) असाच एक प्रकार समोर आला आहे. या ठिकाणी पत्नीची हत्या केल्याप्रकरणी एका पतीला अटक करण्यात आली आहे. अहवालानुसार, पतीने आपल्या पत्नीला तिच्या प्रियकरासोबत नको त्या अवस्थेमध्ये पाहिले व त्यानंतर रागाच्या भरात त्याने तिला जिवंत जाळले.
शेतामध्ये ज्या ठिकाणी ही महिला व तिचा प्रियकर आक्षेपार्ह स्थितीमध्ये होते त्या ठिकाणी पतीने आग लावली. त्यानंतर महिलेचा प्रियकर तिथून पळून गेला. दुसऱ्या दिवशी सकाळी महिलेचा अर्धा जळालेला मृतदेह सापडला. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळ गाठून आरोपीला अटक केली. मृत महिलेचा मृतदेह शवविच्छेदनासाठी जिल्हा रुग्णालयात पाठवण्यात आला आहे. ही घटना बरेली जिल्ह्यातील शाही पोलीस स्टेशन हद्दीतील खियोनच्या गोटिया गावात घडली. महिलेचे वय 35 वर्षे असल्याचे सांगण्यात येत आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नेपाळ सिंग असे आरोपीचे नाव आहे. सुरुवातीला या महिलेची हत्या तिच्या प्रियकरानेच केल्याचे त्याचे म्हणणे होते. दुसरीकडे महिलेचे माहेरचे लोक याबाबत पतीला दोष देत राहिले. पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपीने चौकशीदरम्यान सांगितले की, त्याला तीन मुले आहेत. पतीने रात्री सर्वांना जेवण दिले. त्यानंतर सर्वजण झोपले. रात्री उशिरा जेव्हा त्याला अचानक जाग आली तेव्हा त्याला त्याची पत्नी घरी नसल्याचे दिसले. (हेही वाचा: Bengaluru Shocker: विजेच्या तारेवर पाय पडून आईसह 9 महिन्यांचा मुलीचा मृत्यू; BESCOM विरुद्ध निष्काळजीपणाचा गुन्हा दाखल, तपास सुरु)
घरात सर्वत्र तिचा शोध घेतला मात्र ती सापडली नाही. त्यानंतर जेव्हा तो तिचा शोध घेत गावाबाहेर आला, तेव्हा ती दुसऱ्या पुरुषासोबत आक्षेपार्ह अवस्थेत असल्याचे दिसले. पत्नीला दुसऱ्यासोबत पाहून नेपाळ सिंह संतापला व तो तिथून घरी परतला. त्यानंतर दुसऱ्या दिवशी पत्नीचा मृतदेह आढळला. आपल्या पत्नीची हत्या तिच्या प्रियकराने केल्याचे त्याचे म्हणणे होते. त्यानंतर महिलेच्या माहेरच्या कुटुंबीयांनी घटनास्थळी पोहोचलेल्या पोलिसांना नेपाळ सिंहने ही हत्या केल्याचे सांगितले. अखेर कडक चौकशीत त्याने गुन्ह्याची कबुली दिली.