UP Shocker: जन्माष्टमीच्या दिवशी पुऱ्या खाऊन पडले होते 250 जण आजारी; आता नमुना तपासणीत कुट्टूच्या पिठात आढळली प्राण्यांची विष्ठा आणि लघवी
या सर्वांनी 26 ऑगस्ट म्हणजेच श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या रात्री कुट्टूच्या पिठाच्या पुऱ्या आणि पकोडे खाल्ले होते. विषबाधा झाल्यानंतर या सर्व लोकांना रुग्णालयात दाखल करण्यात आले.
उत्तर प्रदेशातील (Uttar Pradesh) आग्रा व मथुरा येथे जन्माष्टमीच्या दिवशी, लोकांनी कुट्टूच्या पिठापासून बनवलेले अन्न खाल्ले होते. हे अन्न ग्रहण केल्यानंतर जवळजवळ 250 लोक आजारे पडले होते. आता हे अन्न अत्यंत अशुद्ध आणि आरोग्यासाठी असुरक्षित असल्याचे दिसून आले. नमुने तपासल्यानंतर त्यात उंदरांचे मलमूत्र, केस आणि किडे आढळून आले, यासह त्यात बुरशीचीही उपस्थिती होती. याप्रकरणी पाच विक्रेत्यांवर गुन्हा दाखल करण्यात येणार आहे, तर हे पीठ पुरवठा करणाऱ्या बन्सल गृह उद्योगाचा परवाना रद्द करण्यात येणार आहे. महत्वाचे म्हणजे धान्य खराब असल्याचे व्यापाऱ्याला माहित असूनही, त्याने साफसफाई न करता त्याच स्थितीत ते दळून त्याची बाजारात विक्री केली. ज्या ज्या दुकानातून कुट्टूच्या पिठाचे नमुने गोळा केले होते, ते सर्व तपासणीमध्ये फेल झाल्याचे समोर आला आहे.
माहितीनुसार, 27 ऑगस्ट रोजी मथुरामध्ये 250 लोक अन्न विषबाधाचे बळी ठरले होते. या सर्वांनी 26 ऑगस्ट म्हणजेच श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या रात्री कुट्टूच्या पिठाच्या पुऱ्या आणि पकोडे खाल्ले होते. विषबाधा झाल्यानंतर या सर्व लोकांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. परिस्थिती पाहता मथुराच्या डीएमने या प्रकरणाची दखल घेत अन्न सुरक्षा विभागाला या प्रकरणाची चौकशी करण्याचे आदेश दिले होते.
यानंतर विभागाच्या पथकाने पाच व्यावसायिक- राकेश गोयल, अमित अग्रवाल, मथुरेतील गोविंद नगर पोलीस स्टेशन हद्दीतील रमण टॉवर येथील अंकुर अग्रवाल, नवीन अग्रवाल बिर्ला मंदिराजवळ आणि गल्ला मंडीतील ब्रजवासी गूळ विक्रेत्याच्या आस्थापनातून पीठाचे नमुने गोळा केले. हे सर्व नमुने आग्रा येथील फूड लॅबमध्ये तपासण्यात आले. या वेळी पीठ दळताना स्वच्छतेची काळजी घेतली जात नसल्याचे दिसून आले. कुट्टूच्या पिठात प्राण्यांची विष्ठा आणि लघवी आढळली. (हेही वाचा; Bihar Shocker: यूट्यूबवर व्हिडीओ पाहून शस्त्रक्रिया केली; 15 वर्षीय मुलाचा मृत्यू; बोगस डॉक्टर फरार)
या अहवालानंतर अन्न विभागाने तत्काळ प्रभावाने बाजारात लूजमध्ये विकल्या जाणाऱ्या कुट्टूच्या पिठाच्या विक्रीवर बंदी घातली आहे. यासोबतच सर्व फेल नमुन्यांबाबत गुन्हा दाखल केला जात आहे. दरम्यान, जन्माष्टमीच्या दिवशी मोठ्या संख्येने लोकांनी उपवास केला होता. मध्यरात्री भक्तांनी फळे खाऊन उपवास सोडला. यावेळी त्यांना कुट्टूच्या पिठापासून बनवलेल्या पुऱ्या आणि पकोडे देण्यात आले व ते खून 250 लोक आजारी पडले.