UP Crime: व्यक्तीला आपल्या बहिणीच्या लग्नात भेट म्हणून द्यायचा होता टीव्ही; संतापलेल्या पत्नीने केली हत्या
तेथून त्याला जिल्हा रूग्णालयात रेफर करण्यात आले, मात्र जिल्हा रूग्णालयात पोहोचल्यावर त्याला मृत घोषित करण्यात आले.
Wife Gets Husband Killed: उत्तर प्रदेशातील (Uttar Pradesh) बाराबंकी (Barabanki) येथे पत्नीद्वारे पतीच्या हत्येची एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एका व्यक्तीला आपल्या बहिणीला तिच्या लग्नात इच्छित गिफ्ट द्यायचे होते, याच कारणास्तव त्याच्या पत्नीने त्याची हत्या केली आहे. या व्यक्तीला आपल्या बहिणीच्या लग्नात तिला सोन्याची अंगठी आणि टीव्ही द्यायचा होता, मात्र ही गोष्ट त्याच्या पत्नीला रुचली नाही. याच रागातून तिने आपल्या माहेरच्या लोकांकरवी पतीची हत्या केली.
अहवालानुसार, चंद्रप्रकाश मिश्रा असे पिडीत पती व भावाचे नाव आहे, तर पत्नीचे नाव छवी असे आहे. हे प्रकरण बाराबंकी जिल्ह्यातील बद्दुपूर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील सहरी मजरे झरसावा गावाशी संबंधित आहे.
पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितले की, चंद्रप्रकाश मिश्रा यांच्या बहिणीचे लग्न 26 एप्रिलला म्हणजेच दोन दिवसांनी होणार होते. चंद्रप्रकाश यांना आपल्या बहिणीला तिच्या लग्नात सोन्याची अंगठी आणि टीव्ही भेट म्हणून द्यायचा होता. याचा राग चंद्रप्रकाश यांची पत्नी छवीला होता. यावरून दोघांमध्ये वाद झाला. त्यानंतर संतापलेल्या पत्नीने 'चंद्र प्रकाशला धडा शिकवण्यासाठी' तिच्या माहेरून चार-पाच जणांना (भावांना) बोलावले. मंगळवारी सायंकाळी लग्नासाठी मंडप उभारण्यात येत होता, त्याचवेळी छवीच्या भावांनी तिच्या पतीला सुमारे तासभर काठ्यांनी मारहाण केली. (हेही वाचा: UP Shocker: लखनऊमध्ये काळ्या जादूच्या संशयावरून पुतण्याने केली काकाची हत्या)
घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळ गाठून गंभीर अवस्थेत असलेल्या चंद्रप्रकाशला सीएचसी घुणघाटर येथे नेले. तेथून त्याला जिल्हा रूग्णालयात रेफर करण्यात आले, मात्र जिल्हा रूग्णालयात पोहोचल्यावर त्याला मृत घोषित करण्यात आले. या घटनेनंतर पोलिसांनी छवी आणि तिच्या भावांसह पाच जणांना अटक केली आहे. सर्वांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस या प्रकरणाचा गांभीर्याने तपास करत आहेत. चार वर्षांपूर्वी चंद्र प्रकाश आणि छवीचे लग्न झाले होते. या दोघांना एक मुलगा आहे.