UP Shocker: 'हेरॉइन' बाळगल्याच्या आरोपाखाली 20 वर्षे तुरुंगवास भोगला; आता न्यायालयात सिद्ध झाले ती होती साधी पावडर, व्यक्तीची निर्दोष मुक्तता
या दरम्यान त्याचा कोट्यवधींचा संपूर्ण व्यवसाय उद्ध्वस्त झाला, त्याच्या आईचा तणावाखाली मृत्यू झाला, कुटुंबाला समाजातील सर्व मान-सन्मान गमवावा लागला. हे प्रकरण पोलिसांच्या इतिहासातील एक काळा अध्याय म्हणून नेहमी स्मरणात राहील.
उत्तर प्रदेशमध्ये (Uttar Pradesh) मार्च 2003 मध्ये एका व्यक्तीला हेरॉईन (Heroin) बाळगल्याप्रकरणी अटक करण्यात आली होती. आता तब्बल 20 वर्षानंतर ती गोष्ट हेरॉईन नसून एक साधी पावडर असल्याचे न्यायालयात सिद्ध झाले आहे. न केलेल्या आरोपाखाली 20 वर्षे शिक्षा भोगल्यानंतर या व्यक्तीची निर्दोष मुक्तता झाली आहे. अब्दुल्ला अय्युब असे या व्यक्तीचे नाव आहे. अब्दुल्ला अय्युबला 25 ग्रॅम हेरॉईनसह पकडण्यात आले होते, ज्याची किंमत सुमारे एक कोटी रुपये असल्याचे सांगितले गेले होते.
अब्दुल्लाला अटक केल्यानंतर तो अनेक दिवस, आठवडे, महिने आणि अनेक वर्षे विनवणी करत राहिला की त्याच्याकडे हेरॉईन नव्हती व त्याला तुरुंगात टाकण्यासाठी मुद्दाम पुराव्यांशी छेडछाड केली गेली आहे. मात्र पोलिसांनी त्याचे ऐकले नाही. आता अय्युबचे वकील प्रेम प्रकाश श्रीवास्तव यांनी पत्रकारांना सांगितले की, पुराणी बस्ती पोलीस ठाण्याच्या पोलिसांनी पुरावा म्हणून हेरॉईन सादर करून त्याच्या अशिलाला खोट्या प्रकरणात अटक केली होती.
माहितीनुसार, अय्युब हा एक कोट्याधीश व्यावसायिक होता. त्याच्या घरात खुर्शीद नावाचा एक पोलीस हवालदार भाड्याने राहत होता. या हवालदाराने भाडे थकवल्याने अय्युबने त्याला घरातून हाकलून लावले. याच गोष्टीचा बदला घेण्यासाठी पोलीस हवालदाराने मुद्दाम त्याला या खोट्या प्रकणात अडकवले. खुर्शीदने तत्कालीन सीओ सिटी अनिल सिंग, एसओ पुरानी बस्ती लालजी यादव आणि एसआय नर्मदेश्वर शुक्ला यांच्या मदतीने निरपराध अय्युबला अडकवण्याचा कट रचला.
पोलिसांनी खुल्या बाजारात विकली जाणारी एक साधी पावडर हेरॉईन म्हणून दाखवली व ती अय्युबकडे सापडल्याचा आरोप करत त्याला तुरुंगात टाकले. गेली 20 वर्षे पोलीस अनेक कोर्टात हे प्रकरण फिरवत राहिले. मात्र आता माननीय न्यायमूर्ती विजय कुमार कटियार यांनी पोलिसांची बाजू पूर्णपणे धुडकावली, ज्यामध्ये अय्युबकडून एक कोटी रुपयांचे हेरॉइन जप्त केल्याचा दावा करण्यात आला होता.
कोर्टाला न्याय देण्यासाठी लखनौहून 2 तज्ज्ञ लोकांना पाचारण करावे लागले, ज्यांनी दिल्लीला तपासणीसाठी पाठवलेल्या हेरॉईनच्या नमुन्यात छेडछाड झाल्याचे सांगितले. चौकशीदरम्यान इतरही अनेक बाबी समोर आल्या ज्याद्वारे हे निदर्शनास आले की पोलिसांनी संपूर्ण प्रकरण सूडबुद्धीने व चुकीच्या पद्धतीने मांडले होते. आता न्यायालयाने अब्दुल्ला अय्युबची या प्रकरणातून निर्दोष मुक्तता केली आहे. (हेही वाचा: कानपूर हादरले! सात वर्षाच्या मुलाकडून 3 वर्षांच्या मुलीवर बलात्काराचा प्रयत्न)
अब्दुल्ला अय्युबला स्वतःला निर्दोष सिद्ध करायला 20 वर्षे लागली. या दरम्यान त्याचा कोट्यवधींचा संपूर्ण व्यवसाय उद्ध्वस्त झाला, त्याच्या आईचा तणावाखाली मृत्यू झाला, कुटुंबाला समाजातील सर्व मान-सन्मान गमवावा लागला. हे प्रकरण पोलिसांच्या इतिहासातील एक काळा अध्याय म्हणून नेहमी स्मरणात राहील.