CAA Stir: 15 डिसेंबरच्या हिंसाचाराबाबत UP पोलिसांची मोठी कारवाई; AMU च्या 1,000 अज्ञात विद्यार्थ्यांविरूद्ध गुन्हा दाखल
पोलिसांनी विद्यापीठाच्या एक हजार अज्ञात विद्यार्थ्यांविरूद्ध हिंसाचाराचा गुन्हा दाखल केला आहे.
सुधारित नागरिकत्व कायद्याच्या (Citizenship Amendment Act) निषेधार्थ अलीगढ़ मुस्लिम विद्यापीठात, 15 डिसेंबर रोजी झालेल्या हिंसाचाराबाबत उत्तर प्रदेश पोलिसांनी (UP Police) मोठी कारवाई केली आहे. पोलिसांनी विद्यापीठाच्या एक हजार अज्ञात विद्यार्थ्यांविरूद्ध हिंसाचाराचा गुन्हा दाखल केला आहे.
15 डिसेंबर रोजी सुधारित नागरिकत्व कायदा (CAA) आणि एनआरसीविरोधात विद्यापीठ कॅम्पसमध्ये बरीच खळबळ उडाली होती. यावेळी विद्यार्थी व पोलिसांमध्ये बराच वेळ चकमकही सुरु होती. अलीगढ़ विद्यापीठात झालेल्या हिंसाचारादरम्यान तीन विद्यार्थी जखमी झाले. पोलिसांनी या प्रकरणात 3 विद्यार्थ्यांना अटक केली होती. निर्माण झालेली गंभीर परिस्थितीत पाहता प्रशासनाने एएमयू 5 जानेवारीपर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय घेतला होता.
अलीगढ़ मुस्लिम विद्यापीठाच्या माजी विद्यार्थी संघटनेचे अध्यक्ष सलमान इम्तियाज यांनी आरोप केला आहे की, 15 डिसेंबर रोजी पोलिसांनीच विद्यार्थ्यांवर हल्ला केला आणि त्यात अनेक विद्यार्थी जखमी झाले. या घटनेनंतर उत्तर प्रदेश पोलिसांनी त्याच्या ट्विटर हँडलवरून एक व्हिडिओ ट्विट केला. या ट्विटमध्ये पोलिसांनी लिहिले आहे की, 'आम्ही सुरुवातीपासूनच असे म्हणत आहोत की, एएमयू गेट कोणत्याही सुरक्षा एजन्सीने तोडलेले नाही. हा व्हिडिओ याची पुष्टी करतो. 15 डिसेंबर रोजी विद्यापीठ कॅम्पसमध्ये इतकी गोंधळ उडाला होता की, परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांना अश्रुधुराचा वापर करावा लागला. (हेही वाचा: दिल्लीनंतर अलीगढ़ मुस्लिम विद्यापीठात नागरिकत्व दुरुस्ती कायद्याविरोधात आंदोलन; AMU 5 जानेवारीपर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय, इंटरनेट सेवा ठप्प)
पोलिस आणि विद्यार्थ्यांमध्ये झालेल्या या चकमकीच्या न्यायालयीन चौकशीची मागणी, अलीगढ़ मुस्लिम विद्यापीठाच्या शिक्षक संघटनेने केली आहे. विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांविरूद्ध दाखल केलेले 'खोटे खटले' त्वरित मागे घ्यावेत आणि दोषी पोलिसांना कायद्यानुसार शिक्षा देण्यात यावी, अशी मागणीही शिक्षक संघटनेने केली आहे. पोलिस कारवाईला बळी पडलेल्या जामिया मिलिया इस्लामिया आणि एएमयूच्या विद्यार्थ्यांविषयी ऐक्य दर्शविण्यासाठी, 25 डिसेंबर रोजी कॅम्पसमध्ये मेणबत्ती मार्च काढण्यात आला. यावेळी अज्ञात 1200 जणांविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता.