'जोपर्यंत राज ठाकरे आपल्या अहंकाराचा त्याग करत नाहीत, तोपर्यंत त्यांना श्रीरामाचा आशीर्वाद मिळणार नाही'- MP Brij Bhushan Sharan Singh
इतिहास आहे, मोठमोठ्या राजांनी, महाराजांना, सम्राटांनी, संतांनीही जनतेची माफी मागितली आहे.’
मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ (Yogi Adityanath) यांचा वाढदिवस साजरा करण्याचे निमित्त साधून यूपीतील कैसरगंजचे भाजप खासदार ब्रिजभूषण शरण सिंह (Brij Bhushan Sharan Singh) यांनी पुन्हा एकदा राज ठाकरेंवर (Raj Thackeray) निशाणा साधला आहे. हनुमानजी आणि सीता संवादातून त्यांनी मंचावरून थेट सांगितले की, जोपर्यंत राज ठाकरे आपला अहंकार सोडत नाहीत, तोपर्यंत त्यांना श्रीरामाची कृपा मिळणार नाही, श्रीरामाचा आशीर्वाद मिळणार नाही. जोपर्यंत ते त्यांचा अहंकार बाजूला ठेवत नाहीत, तोपर्यंत ते उत्तर भारतात येऊ शकणार नाहीत.
मे महिन्यांच्या पहिल्या आठवड्यात राज ठाकरे यांच्या अयोध्या दौऱ्याला बृजभूषण सिंह यांनी विरोध केला होता. राज ठाकरेंनी उत्तर भारतीयांची माफी मागितल्याशिवाय त्यांना उत्तर प्रदेशात पाऊल ठेवू देणार नाही असे आव्हान बृजभूषण सिंह यांनी दिले होते. त्यानंतर ऐनवेळी तब्येतीचे कारण देत राज ठाकरे यांनी आपला अयोध्या दौरा रद्द केला होता. आता आज योगी आदित्यनाथ यांच्या वाढदिवसानिमित्ताने ब्रिजभूषण शरण सिंह यांनी जनतेशी संवाद साधला व यावेळी त्यांनी राज ठाकरे यांच्यावर टीकास्त्र सोडले.
ते म्हणाले, ‘राज ठाकरे हे आपल्या अहंकारावर ताबा मिळवू शकले नाहीत व त्यामुळे ते अयोध्येला येऊ शकले नाहीत. आमची फार मोठी अपेक्षा नव्हती. त्यांनी जनतेची माफी मागावी हीच आमची इच्छा होती. याची लाज वाटेल असेल तर त्यांनी संतांची माफी मागावी आणि जर याचीही लाज वाटत असेल तर त्यांनी सीएम योगी, पीएम नरेंद्र मोदी यांची माफी मागावी. राज ठाकरे यांनी हिंदू नेते बनण्याचा प्रयत्न केला, भगवे राजकारण करण्याचा प्रयत्न केला पण जे काही केले ते अहंकाराने केले, मनापासून नाही केले. म्हणूनच ते अयोध्येला येऊ शकले नाहीत.’
ब्रिजभूषण शरण सिंह म्हणाले की, ‘राज ठाकरे हे दुर्दैवी आहेत, जर ते समजूतदार असते तर त्यांना जनतेची माफी मागायला काहीच हरकत नव्हती. इतिहास आहे, मोठमोठ्या राजांनी, महाराजांना, सम्राटांनी, संतांनीही जनतेची माफी मागितली आहे.’
दरम्यान, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचा 51 वा वाढदिवस राज्यभरात मोठ्या थाटामाटात साजरा केला जात आहे. राम नगरी अयोध्येत प्रथमच मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचा वाढदिवस साधू-संतांसह साजरा करण्यात आला. कैसरगंजचे खासदार ब्रिजभूषण शरण सिंह हे देखील हजारो समर्थकांसह अयोध्येतील रामकथा पार्कवर पोहोचले. या ठिकाणी 5100 किलोचा लाडू तयार करण्यात आला होता, जो आधी श्री रामललाला अर्पण करण्यात आला आणि नंतर समर्थकांमध्ये वाटण्यात आला.