India-China-Pakistan Border Dispute: भारताने शेजाऱ्यांची जमीन बळकवण्याचा कधीच प्रयत्न केला नाही; भारत-चीन-पाकिस्तान सीमावादावर केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचे वक्तव्य
या वेळी गडकरी यांनी काँग्रेसवर निशाणा साधला आणि पंतप्रधान मोदी यांच्यावर स्थुतीसुमने उधळली.
गेल्या काही दिवसांपासून भारत-चीन सीमावाद (India-China Border Dispute) मुद्दा तापला आहे. भारत आणि पाकिस्तान सीमावाद (India-Pakistan Border Dispute) तर नेहमीच चर्चेत असतो. या वादावर केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी प्रतिक्रिया दिली आहे. गडकरी (Nitin Gadkari) यांनी म्हटले आहे की, भारताने आपल्या शेजाऱ्यांची जमीन बळकवण्याचा कधीही प्रयत्न केला नाही. भारताचा तसा विचारही नाही. आमच्या एका बाजूला पासिक्तान आहे, दुसऱ्या बाजूला चीन. आम्ही शांतता आणि अहिंसा मानतो. आम्हाला तेच हवे आहे. आम्ही कधी भूतान किंवा बांग्लादेश यांचीही जमीन बळकवण्याचा प्रयत्न केला नाही. आम्हाला पाकिस्तान किंवा चीन या दोघांचीही जमीन नको आहे. आम्हाला एकच गोष्ट हवी आहे ती म्हणजे शांतता.
पुढे बोलताना नितीन गडकरी यांनी भारताकडे वाईट नजरेने पाहणाऱ्या दहशतवाद्यांना इशारा दिला. ते म्हणाले, आज दहशतवाद्यांना माहिती आहे की, जर त्यांनी देशात काही गडबड केली तर त्याचा परिणाम काय होईल. देशात एक भक्कम आणि स्थिर सरकार आहे. जे दहशतवाद्यांना ठेचू शकते. हे आमचे सरकार आहे. (हेही वाचा, कोरोनाचे संकट फार काळ टिकून राहणार नाही, COVID19 वर मात करण्यासाठी लवकरच लस उपलब्ध होईल - नितीन गडकरी)
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून 'गुजरात जनसंवाद रॅली'ला गुरुवारी संबोधित केले. या वेळी गडकरी यांनी काँग्रेसवर निशाणा साधला आणि पंतप्रधान मोदी यांच्यावर स्थुतीसुमने उधळली. ते म्हणाले, काँग्रेसने 70 वर्षात गरीबी हटाओचा नारा दिला. परंतू, देशातील शेतकरी, मजूर आणि गरीबांची गरीबी दूर झाली नाही. मात्र, काँग्रेस कार्यकर्त्यांची गरीबी जरुर दूर झाली, असा टोलाही त्यांनी लगावला.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कार्यकाळात केंद्र सरकारने जे काम केले त्याची तुलना मागील 55 वर्षांमध्ये करायची तर मी विश्वासाने सांगतो की मोदी काँग्रेसने गेल्या 55 वर्षांत जे केले ते भाजपा सरकारने 5 वर्षांत करुन दाखवले असेही गडकरी म्हणाले.