Unemployment in India: भारतात 2022-23 मध्ये शहरी बेरोजगारी 5.4% वर; गोवा आणि केरळमध्ये सर्वाधिक, सरकारची संसदेत माहिती
2020-21 मध्ये कार्यरत तरुणांची संख्या 52.6 टक्के होती, तर 2021-22 मध्ये ती 52.9 टक्के झाली.
Unemployment in India: भारत हा युवक प्रदान देश आहे. अनेक देशांपेक्षा येथे तरुणांची संख्या जास्त आहे. मात्र देशातील अनेक तरुण सध्या बेरोजगारीचे बळी ठरत आहेत. या बेरोजगार तरूणांचा संघर्ष या ना त्या मार्गाने अनेकदा आपण पाहतो. आता सरकारी आकडेवारीद्वारे बेरोजगारांची संख्या किती मोठी आहे, हे समोर आले आहे. बेरोजगारीबाबत संसदेत सरकारला विचारणा केली असता, कामगार व रोजगार राज्यमंत्री शोभा करंदलाजे यांनी यावर उत्तर दिले.
करंदलाजे यांनी सांगितले की, देशातील रोजगार आणि बेरोजगारीची आकडेवारी नियतकालिक श्रम बल सर्वेक्षणाद्वारे गोळा केली जाते. हा डेटा 2017 पासून दरवर्षी जुलै आणि जून महिन्यात जारी केला जातो. ताज्या अहवालानुसार, 2022-23 मध्ये, 15 वर्षे आणि त्याहून अधिक वयाच्या तरुणांमधील बेरोजगारीचा दर ग्रामीण भारतात 2.4 आणि शहरी भारतात 5.4 इतका होता.
या प्रश्नाच्या उत्तरात, कामगार लोकसंख्या गुणोत्तर (WPR) अहवालावर आधारित, सरकारने सांगितले की, गेल्या काही वर्षांत काम करणाऱ्या तरुणांची संख्या वाढली आहे. 2020-21 मध्ये कार्यरत तरुणांची संख्या 52.6 टक्के होती, तर 2021-22 मध्ये ती 52.9 टक्के झाली. तर 2022-23 मध्ये ही संख्या 56 टक्क्यांवर गेली. यासह शोभा करंदलाजे यांनी लोकसभेत सांगितले की, आदिवासी समुदायांमधील बेरोजगारीच्या दरात लक्षणीय घट दिसून आली आहे, जी 2022-23 मध्ये 1.8 टक्के होती. आदिवासी समुदायांसाठी सामान्य परिस्थितीत अंदाजित बेरोजगारीचा दर (UR) 2019-20 मध्ये 3.4 टक्के, 2020-21 मध्ये 2.7 टक्के आणि 2021-22 मध्ये 2.4 टक्के होता.
अहवालानुसार, 2022-23 मध्ये गोव्यात सर्वाधिक 9.7 टक्के बेरोजगारी होती, त्यानंतर केरळमध्ये 7.0 टक्के, अरुणाचल प्रदेश 4.8 टक्के, उत्तराखंड 4.5 टक्के, तेलंगणा 4.4 7.0 टक्के आणि तामिळनाडूमध्ये 4.3 टक्के बेरोजगारी होती. दुसरीकडे, त्रिपुरा (1.4%), आसाम (1.7%), गुजरात (1.7%), झारखंड (1.7%), दिल्ली (1.9%) आणि पश्चिम बंगाल (2.2%) मध्ये सर्वात कमी बेरोजगारीचा दर नोंदवला गेला. (हेही वाचा: Loksabha Polls 2024: यंदाच्या लोकसभा निवडणुकीच्या मतमोजणीत झाली चूक? पडलेल्या आणि मोजलेल्या मतांमध्ये आढळली मोठी तफावत- ADR Report)
बेरोजगारी समजून घेण्यासाठी आपल्याला प्रथम श्रमशक्ती समजून घ्यावी लागेल. वास्तविक, भारतात 15 वर्षे आणि त्याहून अधिक वयाच्या लोकांची गणना कार्यरत वयोगटात केली जाते. या कार्यरत वयोगटातील एकूण लोकांची संख्या आणि कामाच्या शोधात असलेल्या लोकांची एकूण संख्या याला सध्याची श्रमशक्ती म्हणतात. आता बेरोजगारीची व्याख्या समजून घेऊ. अर्थशास्त्रानुसार, बेरोजगारी ही अशी परिस्थिती आहे, जेव्हा कामगार दलातील एखादी व्यक्ती रोजगाराच्या शोधात असते. ही व्यक्ती रोजगारासाठी पात्र असते, परंतु तिला रोजगार मिळत नाही. या पॅरामीटर्सच्या आधारे, कामगार दलातील बेरोजगारांची टक्केवारी मोजली जाते.