ब्रिटनच्या गृहमंत्री Suella Braverman यांच्या वडिलांच्या गोव्यातील मालमत्तांवर बेकायदेशीर कब्जा, SIT सुरु केला तपास
पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, पॉवर ऑफ अॅटर्नीद्वारे आसगाव येथील फर्नांडिस व त्यांच्या कुटुंबीयांची मालमत्ता आपल्या नावावर करण्यासाठी काही अज्ञात व्यक्तींनी कागदपत्रे सादर केली होती, असे तक्रारीत म्हटले आहे.
टिक टॉक स्टार आणि हरियाणातील भाजप नेत्या सोनाली फोगट यांच्या निधनानंतर गोवा (Goa) राज्य सध्या चर्चेत आहे. आता गोव्यात मालमत्तेचा नवा वाद निर्माण झाला आहे, ज्याचा थेट आंतरराष्ट्रीय संबंध आहे. याप्रकरणी गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांच्याकडे ईमेलद्वारे तक्रारही करण्यात आली होती. ब्रिटनच्या गृहमंत्री सुएला ब्रेव्हरमन (UK Home Minister Suella Braverman) यांचे वडील क्रिस्टी फर्नांडिस यांच्या गोव्यात दोन मालमत्ता आहेत, ज्या एका अज्ञात व्यक्तीने बनावट पॉवर ऑफ अॅटर्नीद्वारे हडपण्याचा प्रयत्न केला आहे.
सुएला ब्रेव्हरमन यांच्या वडिलांनी उत्तर गोव्यातील त्यांच्या दोन वडिलोपार्जित मालमत्तांवर अज्ञात व्यक्तीने कब्जा केल्याची तक्रार दाखल केली आहे. याप्रकरणी राज्य पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून विशेष तपास पथकाने (SIT) तपास सुरू केल्याची माहिती एका अधिकाऱ्याने दिली. भारतीय वंशाच्या बॅरिस्टर ब्रेव्हरमन यांना या आठवड्याच्या सुरुवातीला ब्रिटनच्या नव्या पंतप्रधान लिझ ट्रस यांनी देशाचे नवीन गृहमंत्री म्हणून नियुक्त केले होते. (हेही वाचा: Illegal Loan Apps: अवैधरित्या कर्जपुरवठा करणाऱ्या ऍप्सवर होणार कारवाई; अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्या अध्यक्षतेखाली बैठक)
ब्रेव्हरमनचे वडील क्रिस्टी फर्नांडिस यांनी तक्रार केली आहे की, त्यांच्या आसगावमधील एकूण 13,900 चौरस मीटरच्या दोन मालमत्तांवर बेकायदेशीरपणे कब्जा करण्यात आला आहे. पोलिस अधीक्षक (एसआयटी) निधी वासन यांनी शुक्रवारी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. त्यांनी सांगितले की, तक्रारीच्या आधारे एसआयटीने एफआयआर नोंदवला आणि या प्रकरणाचा तपास सुरू केला.
पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, पॉवर ऑफ अॅटर्नीद्वारे आसगाव येथील फर्नांडिस व त्यांच्या कुटुंबीयांची मालमत्ता आपल्या नावावर करण्यासाठी काही अज्ञात व्यक्तींनी कागदपत्रे सादर केली होती, असे तक्रारीत म्हटले आहे. फर्नांडिस यांनी गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत, पोलीस महासंचालक जसपाल सिंग आणि गोव्याच्या एनआरआय आयुक्तालयाला ईमेलद्वारे तक्रारही पाठवली आहे.