Video- उद्धव ठाकरे अयोध्या दौरा: विमान उड्डाणावेळी फैजाबाद विमानतळावर नीलगाय; थोडक्यात बचावले ठाकरे कुटुंबीय
त्यामुळे धोकादायक परिस्थिती निर्माण झाली. मात्र, कोणत्याही अडथळ्याशिवाय विमानाने उड्डाण घेतले.
Uddhav Thackeray Ayodhya Tour: राम मंदिर मुद्द्यावरुन गेले दोन दिवस राष्ट्रीय आणि स्थानिक प्रसारमाध्यांमांचे प्रमुख केंद्रस्थान राहिलेले शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे फैजाबाद विमानतळावर थोडक्यात बचावले. या वेळी त्यांच्यासोब पत्नी. रश्मी ठाकरे आणि युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे हेसुद्धा होते. ठाकरे कुटुंबियांचे विमान फैजाबाद विमानतळावरुन उड्डाण घेत असताना धावटपट्टी एक नीलगाय अचानकच आली. त्यामुळे धोकादायक परिस्थिती निर्माण झाली. मात्र, कोणत्याही अडथळ्याशिवाय विमानाने उड्डाण घेतले.
अयोध्या दौऱ्यावर असलेले उद्धव ठाकरे विमानतळावर पोहोचत असतानाचे दृश्य टीपण्यासाठी उपस्थित असलेल्या प्रसारमाध्यमांनी ही दृश्यं कॅमेऱ्यात कैद केली. नियमीतपणे उड्डाण करणारी विमाने धावपट्टीवर असताना आणि नसतानाही विमानतळ प्रशासन विमानतळ आणि धावपट्टी परसिरात सुरक्षेची पाहणी करते. त्यातही कोणी व्हीआयपी व्यक्ती असल्यास विमानतळ परिसरातील सुरक्षा व्यवस्था अधिक कडक करण्यात येते. त्यामुळे उद्धव ठाकरे आले होते त्यावेळी सुरक्षा व्यवस्था तितकी काळजीपूर्वक केली होती काय? जर केली असेल तर, मग विमानउड्डाणावेळी नीलगाय धावपट्टीजवळ आलीच कशी? याबाबत चौकशी होण्याची शक्यता आहे. (हेही वाचा, अयोध्या दौरा : न्यायालयाच्या निर्णयाआधी संसदेने कायदा करावा)
उद्धव ठाकरे हे राम मंदिराच्या मुद्द्यावरुन दोन दिवस (२५,२५ नोव्हेंबर) अयोध्येच्या दौऱ्यावर होते. त्यांचा हा दौरा देशभरात गाजला. या दौऱ्यासाठी शिवसेनेने जोरदार नियोजन केले होते. महाराष्ट्रातून हजारो शिवसैनिक अयोध्येत दाखल झाले होते.