Waqf Bill JPC Meeting: वक्फ विधेयक जेपीसी बैठकीत वादावादी; TMC नेते कल्याण बॅनर्जी जखमी
या घटनेनंतर बैठक स्थगित करण्यात आली.
Waqf Bill News: वादग्रस्त वक्फ (दुरुस्ती) विधेयक, 2023 वरील संयुक्त संसदीय समितीच्या (JPC) बैठकीस मंगळवारी (22 ऑक्टोबर) नाट्यमय वळण लागले. या बैठकीत भाजप नेते अभिजीत गंगोपाध्याय (Abhijit Gangopadhyay) यांच्याशी झालेल्या वादादरम्यान तृणमूल कॉंग्रेसचे (Trinamool Congress) नेते कल्याण बॅनर्जी (Kalyan Banerjee) जखमी झाले. प्राप्त माहितीनुसार, बॅनर्जी यांना राग अनावर झाला. त्यामुळे त्यांनी काचेची पाण्याची बटली आपटली. जी फुटली आणि त्यांना जखम झाली. प्राप्त माहितीनुसार, बॅनर्जी यांच्या अंगठ्याला आणि तर्जनीला दुखापत झाली, ज्यामुळे बैठक अचानक थांबवावी लागली.
वक्फ विधेयकातील प्रस्तावित सुधारणांवर जेपीसीत चर्चा
भाजप खासदार जगदंबिका पाल यांच्या अध्यक्षतेखालील समिती वक्फ विधेयकातील प्रस्तावित सुधारणांवर निवृत्त न्यायाधीश आणि कायदेशीर तज्ज्ञांच्या पॅनेलकडून सुनावणी घेत असताना हा संघर्ष झाला. ज्यामुळे तीव्र राजकीय वाद निर्माण झाला आहे. प्रस्तावित बदलांमुळे वक्फ मालमत्तांवर नियंत्रण केंद्रीकृत होऊ शकते, ज्यामुळे अल्पसंख्याकांच्या हक्कांवर संभाव्य परिणाम होऊ शकतो, असा युक्तिवाद करत, कल्याण बॅनर्जी यांच्यासह विरोधी सदस्यांनी चर्चेत कायदेशीर तज्ञांच्या सहभागाबद्दल चिंता व्यक्त केली. (हेही वाचा, I.N.D.I.A. Vs NDA On Mimicry Row: राज्यसभा सभापती नक्कल वाद, इंडिया विरुद्ध एनडीए आमनेसामने, काय म्हणाले TMC खासदार कल्याण बॅनर्जी?)
बैठकीत वाद, खासदार जखमी
बैठकीदरम्यान, बॅनर्जी आणि अभिजीत गंगोपाध्याय यांच्यात शाब्दिक चकमक वाढली, ज्यामुळे ही नाट्यमय घटना घडली. एक क्षण असा आला की, बॅनर्जी यांनी टेबलावरील पाण्याची बाटली आपटली आणि चुकून ते स्वतःलाच जखमी करुन बसले. प्रत्यक्षदर्शींच्या हवाल्याे प्रसारमाध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार, टीएमसी नेत्याववर तातडीने प्रथमोबचार करण्यात आले.
दरम्यान, एआयएमआयएमचे प्रमुख असदुद्दीन ओवेसी आणि आपचे नेते संजय सिंह यांनी त्वरित हस्तक्षेप केला आणि बॅनर्जी यांना वैद्यकीय उपचारांसाठी खोलीच्या बाहेर नेले. या घटनेनंतर ही बैठक स्थगित करण्यात आली होती. (हेही वाचा, Justice Abhijit Gangopadhyay Will Join Bjp: न्यायदान सोडून राजकारणाच्या प्रेमात, हायकोर्टाचे न्यायाधीश अभिजित गंगोपाध्याय यांचा राजीनामा; भाजपच्या तिकीटावर निवडणूक लढविण्याची शक्यता)
वक्फ विधेयकावर विरोधकांकडून चिंता व्यक्त
वक्फ (दुरुस्ती) विधेयक, 2023 हा सत्ताधारी भाजप आणि विरोधी पक्षांमधील वादाचा केंद्रबिंदू बनला आहे. इस्लामिक कायद्यांतर्गत धार्मिक किंवा धर्मादाय हेतूंसाठी दान केलेल्या आणि वक्फ मंडळांच्या देखरेखीखाली असलेल्या वक्फ मालमत्तांच्या प्रशासन आणि व्यवस्थापनामध्ये सुधारणा करण्याचा या विधेयकाचा उद्देश आहे. प्रस्तावित सुधारणा केंद्र सरकारला जास्तीचे अधिकार देऊ शकतात, ज्यामुळे राज्य वक्फ मंडळांची स्वायत्तता कमी होऊ शकते आणि अल्पसंख्याक समुदायांच्या हक्कांचे उल्लंघन होऊ शकते, असा युक्तिवाद बॅनर्जी यांच्यासह विरोधी नेते करतात. समितीच्या चर्चेत न्यायाधीश आणि वकिलांच्या सहभागावरही विरोधी सदस्यांनी टीका केली आहे, जे विधेयकाच्या निकालावर प्रभाव टाकण्यात त्यांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करतात.