यावर्षीचा मान्सून हंगाम समाप्त; 25 वर्षाचा विक्रम मोडीत, देशात 1994 नंतर सर्वाधिक पाऊस- IMD
मात्र अद्याप मान्सून देशाच्या अनेक भागात सक्रीय असून, दक्षिण-पश्चिम मान्सूनची माघार 10 ऑक्टोबरच्या सुमारास वायव्य भारतातून सुरू होण्याची शक्यता आहे.
अखेर यावर्षीचा पावसाळा (Rainy Season) संपला आहे, याबाबत हवामान विभागाने (IMD) अधिकृतरित्या घोषणा केली. हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार यावर्षी 1994 नंतर, म्हणजे तब्बल 25 वर्षानंतर इतका जास्त पाऊस झाला आहे. मात्र अद्याप मान्सून (Monsoon) देशाच्या अनेक भागात सक्रीय असून, दक्षिण-पश्चिम मान्सूनची माघार 10 ऑक्टोबरच्या सुमारास वायव्य भारतातून सुरू होण्याची शक्यता आहे. मान्सून सामान्यत: 1 सप्टेंबरपासून पश्चिम राजस्थानातून माघार घेण्यास सुरुवात करतो, त्यामानाने यावर्षी मान्सूनने उशिरापर्यंत हजेरी लावली होती.
हवामान खात्याच्या 36 उपविभागांपैकी 12 मध्ये सामान्यपेक्षा अधिक पाऊस झाला, तर 19 ठिकाणी सामान्य पाऊस नोंदविला गेला. यावेळी देशात 88 सेमी पावसाची नोंद झाली आहे. उत्तर प्रदेश आणि बिहारमध्ये पावसामुळे अद्याप पूरसदृश परिस्थिती असून दोन्ही राज्यात पावसामुळे सुमारे 129 जणांचा मृत्यू झाला आहे. दक्षिण-पश्चिम भारताबद्दल बोलायचे झाले तर इथे या वेळी 10 ऑक्टोबरपर्यंत पाऊस पडण्याची शक्यता आहे. 2007 मध्ये 30 सप्टेंबरपर्यंत पाऊस चालू होता. परंतु या वेळी 1961 नंतर इतके दिवस पावसाचा मुक्काम राहिला आहे. (हेही वाचा: महाबळेश्वर मध्ये पडला Monsoon 2019 मधील सर्वाधिक पाऊस; मौसिनराम आणि चेरापुंजी ला मागे टाकत 8012.1 मीमी पर्जन्यनोंद)
1996 नंतर पहिल्यांदाच यावर्षी ऑगस्टमध्ये इतका पाऊस झाला. याखेरीज 1917 नंतर सप्टेंबरमध्ये दुसऱ्यांदा असा पाऊस पडला. हवामान खात्याच्या म्हणण्यानुसार जुलै आणि ऑगस्ट महिन्यात पाऊस हा अंदाजापेक्षा अडीच पट जास्त आहे. दरम्यान, यावर्षी हवामान खात्याने 6 जूनला केरळ किनाऱ्यावर पाऊस पोहचेल असे सांगितले होते, मात्र मान्सून आठवडाभर उशिरा पोहचला.
महाराष्ट्राबद्दल बोलायचे झाले तर, काही दिवसांपूर्वीच हवामान खात्याने प्रसिद्ध केलेल्या माहितीनुसार महाराष्ट्रात, सरासरीपेक्षा 32 टक्के अधिक पाऊस झाला आहे. राज्यातील पुणे जिल्ह्यात सर्वाधिक पावसाची नोंद झाली आहे, तर महाबळेश्वर हे जगातील सर्वाधिक पावसाचे ठिकाण ठरले आहे.
सरासरीपेक्षा 60 टक्क्यांहून अधिक - मुंबई, ठाणे, पालघर, सातारा, नाशिक, धुळे
सरासरीपेक्षा 20 ते 59 टक्क्याहून अधिक - रत्नागिरी, सिंधुदुर्ग, सांगली, नंदुरबार, जळगाव, नागपूर आणि गडचिरोली
इतर जिल्ह्यांमध्ये जरी सरासरी पाऊस झाला असला तरी, पावसाने यावर्षी चांगलाच उच्छाद मांडला होता. सांगली, कोल्हापूर, सातारा आणि पुणे येथील पूरस्थिती हे त्याची काही उदाहरणे.