पंतप्रधान नरेंद्र मोदींसाठी भक्ताने बांधले मंदिर; देव समजून रोज करतो पूजा व आरती (Photo)
तो दररोज या मंदिरात नरेंद्र मोदींची पूजा व आरती करतो. एखाद्या राजकारणाचे मंदिर बांधले गेले असल्याची ही पहिलीच घटना नाही.
पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांचा चाहता असलेल्या, तामिळनाडूतील (TamilNadu) एका शेतकऱ्याने आपल्या शेतात चक्क नरेंद्र मोदींचे मंदिर बांधले आहे. पंतप्रधान किसान सन्मान निधी यांसारख्या कल्याणकारी योजनांचा आपल्यावर प्रभाव आहे आणि त्याचा फायदाही आपल्याला झाला आहे असे या शेतकर्याचे म्हणणे आहे.
शंकर (50) असे या शेतकऱ्याचे नाव असून, इराकुड़ी गावात गेल्या आठवड्यात या मंदिराचे उद्घाटन केले. तो दररोज या मंदिरात नरेंद्र मोदींची पूजा व आरती करतो. एखाद्या राजकारणाचे मंदिर बांधले गेले असल्याची ही पहिलीच घटना नाही. याधीही देशात बरेच नेते व बॉलिवूड स्टार्सची मंदिरे बांधली गेली आहेत.
चला जाणून घेऊया पीएम मोदींच्या या अद्वितीय मंदिराविषयी -
नरेंद्र मोदींच्या या मंदिराची लांबी व रुंदी 8 8 फूट आहे. लोकांच्या स्वागतासाठी मंदिराच्या समोर पारंपारिक रांगोळीही बनविण्यात आली आहे. या मंदिरात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा पुतळा बसवण्यात आला आहे. या मंदिरातील पीएम मोदींचा पुतळा 2 फूट उंच आहे. या मंदिरासाठी साधारण 12 लाख रुपये खर्च आला आहे. मोदींच्या पुतळ्याच्या दोन्ही बाजुला पारंपारिक दिवे लावण्यात आले आहेत. त्यांच्या कपाळावर टिळक असून गुलाबी कुर्ता आणि निळ्या रंगाची शाल परिधान केलेल्या मोदींचा हा पुतळा आहे. (हेही वाचा: नरेंद्र मोदी यांचे अंध 'भक्त' ओळखण्याच्या काही सोप्या पद्धती! ; राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे खोचक ट्विट)
शंकर यांच्याकडे मंदिरासाठी पुरेसे पैसे नसल्याने हे मंदिर बांधण्यास 8 महिने लागले. या मंदिराच्या भिंतींवर तामिळनाडूच्या माजी मुख्यमंत्री जयललिता, विद्यमान मुख्यमंत्री पलानीसामी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचे फोटोसुद्धा लावले आहेत. हे मंदिर पाहण्यासाठी दूरदूरून लोक येत आहेत. शंकर त्यांच्या गावात शेतकरी संघटनेचे अध्यक्षही आहेत. 2014 मध्येच त्यांनी पंतप्रधान मोदींचे मंदिर बांधण्याचा विचार केला होता, परंतु त्यावेळी पैशाअभावी ते होऊ शकले नाही.