Telangana: काय सांगता? शेतकऱ्याने टोमॅटो विकून 15 दिवसांत कमावले तब्बल 2 कोटी रुपये; जाणून घ्या सविस्तर
विविध ठिकाणी 100 ते 120 रुपयांपर्यंत किंमत आहे. यामुळे टोमॅटोच्या शेतकऱ्यांना सुगीचे दिवस आले आहेत.
तेलंगणातील (Telangana) मेडक जिल्ह्यातील एका शेतकऱ्याने गेल्या 15 दिवसांत टोमॅटो (Tomatoes) विकून सुमारे दोन कोटी रुपये कमावले आहेत. मेडक जिल्ह्यातील कौदिपल्ली तालुक्यातील मोहम्मद नगर गावातील बी महिपाल रेड्डी यांनी मंगळवारी सांगितले की, इतक्या जास्त किंमतीचे टोमॅटो विकल्यानंतरही त्यांच्या शेतात अजून एक कोटी रुपये किमतीचे टोमॅटो काढणे बाकी आहे. मात्र, सततच्या पावसामुळे पिकाचे नुकसान होणार असल्याने त्यांना पिकाची काळजी वाटत आहे, असे त्यांनी पीटीआयला सांगितले.
गेल्या आठवडाभरात टोमॅटोचे भाव देशभरात गगनाला भिडले आहेत. विविध ठिकाणी 100 ते 120 रुपयांपर्यंत किंमत आहे. यामुळे टोमॅटोच्या शेतकऱ्यांना सुगीचे दिवस आले आहेत.
रेड्डी यांनी सांगितले की, आधी ते गावात आपल्या 20 एकर शेतजमिनीत भातशेती करत होते. मात्र भातशेतीत अनेकवेळा नुकसान झाल्यानंतर त्यांनी आठ वर्षांपूर्वी आठ एकरात भाजीपाला पिकवण्यास सुरुवात केली होती. तेलंगणाला सहसा शेजारच्या आंध्र प्रदेशातील मदनपल्ली आणि कर्नाटकातील कोलार येथून टोमॅटो मिळतात. रेड्डी यांनी त्या ठिकाणांना भेटी देऊन टोमॅटो लागवडीची शैली आणि तंत्रांचा अभ्यास केला. एप्रिल आणि मे महिन्यात तेलंगणाचे तापमान जास्त असते, जे टोमॅटोच्या लागवडीसाठी योग्य नाही. त्यामुळे तापमान आणि हवामानाच्या परिस्थितीवर नियंत्रण ठेवण्यासाठी रेड्डी यांनी 16 लाख रुपये खर्चून आठ एकर टोमॅटो लागवडीच्या जागेवर नेट शेड उभारले.
यामुळे टोमॅटोचे उच्च आणि दर्जेदार उत्पादन सुनिश्चित झाले. ते एप्रिलमध्ये टोमॅटोची पेरणी करतात आणि जूनच्या अखेरीस पीक काढणीसाठी तयार होते. महिपाल रेड्डी म्हणाले की, ते लागवडीत ठिबक सिंचन आणि स्टेकिंग पद्धती वापरतात. जर सर्व काही ठीक झाले तर ते आठवडाभरात त्यांचे सर्व टोमॅटो विकले जातील. त्यांनी त्यांचे टोमॅटो हैदराबाद, बोयनपल्ली, शाहपूर आणि पाटनचेरू मार्केटमध्ये विकले आहेत. (हेही वाचा: YouTube Videos, Google Reviews Work: यूट्यूब व्हिडिओ लाईक करा, गुगल रिव्ह्यू लिहा आणि पैसे कमवा; 15,000 भारतीयांची 700 कोटींची फसवणूक, जाणून घ्या सविस्तर)
टोमॅटोच्या 25 ते 28 किलोच्या बॉक्सला प्रत्येकी 2,500 ते 2,700 रुपये भाव मिळाला. त्यांनी सुमारे 7,000 क्रेट विकून सुमारे दोन कोटी रुपये मिळवले आहेत. रेड्डी यांनी स्वतःच्या 20 एकर जमिनीव्यतिरिक्त 80 एकर जमीन भाडेतत्त्वावर घेतली आहे. त्या ठिकाण 60 एकरमध्ये भाताची लागवड केली आहे आणि उरलेल्या जमिनीत ते इतर पिके घेतात.