Tata Steel Bonus: कोरोना विषाणू काळात टाटा स्टीलच्या कर्मचाऱ्यांची चांदी; कंपनीने जाहीर केला तब्बल 235 कोटींचा बोनस

या घोषणेमुळे कोरोना विषाणूच्या (Coronavirus) काळात कंपनी आपल्या कर्मचार्‍यांना जास्तीत जास्त 3 लाख रुपयांचा बोनस देईल.

TATA Steel | (Photo credit: Tata Steel)

देशातील सर्वात मोठी स्टील कंपनी आणि टाटा ग्रुपच्या मालकीच्या ‘टाटा स्टील’ने (Tata Steel) आपल्या कर्मचार्‍यांना बोनस (Bonus) जाहीर केला आहे. या घोषणेमुळे कोरोना विषाणूच्या (Coronavirus) काळात कंपनी आपल्या कर्मचार्‍यांना जास्तीत जास्त 3 लाख रुपयांचा बोनस देईल. मॅनेजमेंट आणि टाटा वर्कर्स युनियन यांच्यातील करार लक्षात घेता, कंपनीने यंदाच्या बोनससाठी 235.54 कोटी रुपयांची तरतूद केली आहे. कंपनीने प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे की कोविड-19 संकट असतानाही टाटा स्टीलने आपल्या तीन वर्षाच्या बांधिलकीचा आदर करत, कर्मचार्‍यांना पूर्ण बोनस देण्याचा निर्णय घेतला आहे.

विद्यमान वार्षिक बोनस योजनेत सुधारणा करण्याबाबत व्यवस्थापन आणि युनियन सहमत आहेत. हे 2017-18, 2018-19 आणि 2019-20 साठी वैध असेल. कंपनीच्या वेगवेगळ्या ठिकाणी काम करणार्‍या पात्र कर्मचार्‍यांना ही सुविधा उपलब्ध असेल. यावर्षी जमशेदपूर युनिटसह, ट्यूब विभागातील एकूण 12,807 कर्मचार्‍यांमध्ये बोनसची रक्कम वितरित केली जाईल. ज्यामध्ये टाटा स्टीलच्या जमशेदपूर प्लांटमध्ये (ट्यूब विभागासह) एकूण 142.05 कोटी रुपयांचा बोनस असेल. 14 ऑक्टोबरपर्यंत मान्य झालेल्या सेटलमेंटची रक्कम कर्मचार्‍यांच्या बँक खात्यात जमा केली जाईल.

उर्वरित 93.49 कोटी रुपये कलिंगानगर प्रकल्प, विपणन व विक्री, नोवामुंडी, जमाडोबा, झारिया आणि बोकारो खाणीतील 11.267 कर्मचार्‍यांमध्ये वितरीत केले जातील. करारानुसार कर्मचार्‍यांना सरासरी 1,10,914 रुपये बोनस मिळेल. मात्र वरच्या ग्रेडच्या मोठ्या पदावरील कर्मचाऱ्यांना जास्तीत जास्त 3,01,402 रुपयांचा बोनस मिळेल. त्याचबरोबर एनएस ग्रेडच्या सर्वाधिक उपस्थिती कर्मचार्‍यांना, 84,496 रुपये मिळतील. एनएस ग्रेड कर्मचाऱ्यांना किमान बोनस 26,839 रुपये निश्चित करण्यात आला आहे.

मागील वर्षाच्या तुलनेत या वेळी एकूण बोनस रकमेमध्ये सुमारे 4 कोटी रुपये कमी आहेत, परंतु कर्मचार्‍यांच्या खात्यात अधिक रक्कम जाईल. ग्रेड रिव्हिजननुसार, यावेळी बोनसची रक्कम मागील वेळेपेक्षा जास्त असेल, त्यामध्ये बेसिक, डीए आणि 18 महिन्यांच्या थकबाकीची रक्कम असेल. टक्केवारीच्या बाबतीत गेल्या वर्षी 15.6 टक्के बोनस मिळाला होता, यावेळी तो 12.9 टक्के आहे.