Tandoor Ban: मध्य प्रदेश सरकारने घातली 'तंदूरी रोटी'वर बंदी; हॉटेल आणि ढाबा मालकांना नोटीसा जारी, जाणून घ्या कारण
त्याऐवजी इलेक्ट्रिक ओव्हन किंवा एलपीजी गॅस सिलिंडर वापरण्याच्या सूचनाही देण्यात आल्या आहेत.
मध्य प्रदेशातील (Madhya Pradesh) तंदूरी रोटी (Tandoori Roti) खाणाऱ्यांसाठी एक वाईट बातमी आहे. आता भोपाळ, इंदूर, जबलपूर आणि ग्वाल्हेरमध्ये तंदुरी रोटी मिळणार नाही. वाढत्या वायू प्रदूषणाच्या पार्श्वभूमीवर सरकारने तंदूर रोटीवर बंदी घातली आहे. सरकारच्या आदेशाचे उल्लंघन केल्यास 5 लाख रुपयांपर्यंत दंड आकारला जाईल. मध्य प्रदेशातील अनेक शहरांमध्ये वायू प्रदूषण वेगाने पसरत आहे. हे थांबवण्यासाठी सरकारने कंबर कसली आहे.
वायू प्रदूषणाच्या पार्श्वभूमीवर सरकारने एक मोठे पाऊल उचलत तंदुरी रोटीवर बंदी घातली आहे. तंदुरी रोटी बनवण्यासाठी लाकूड व कोळशाचा वापर होतो, ज्यामुळे वायू प्रदूषण वाढण्याचा धोका आहे. म्हणूनच मध्य प्रदेशच्या अन्न विभागाने तंदूर रोटीवरील बंदीचा हा आदेश जारी केला आहे. राज्यातील हॉटेल-ढाबा चालकांना अन्न विभागाकडून नोटिसा देण्यात आल्या आहेत. अन्न विभागाने या आदेशात वाढत्या प्रदूषणाचा हवाला दिला आहे.
जारी केलेल्या आदेशात अन्न विभागाने हॉटेल आणि ढाबा चालकांना यापुढे लाकूड-कोळशाचा तंदूर बनवण्यासाठी वापर होणार नाही, असे स्पष्टपणे सांगितले आहे. त्याऐवजी इलेक्ट्रिक ओव्हन किंवा एलपीजी गॅस सिलिंडर वापरण्याच्या सूचनाही देण्यात आल्या आहेत. मध्य प्रदेशात तंदूरी रोटीचा जबरदस्त ट्रेंड आहे. मात्र राज्य सरकारच्या या सूचनांनंतर तंदुरी रोटीप्रेमींना मोठा धक्का बसला आहे. तसेच या आदेशामुळे ढाबा-हॉटेल मालकांची झोप उडाली आहे. (हेही वाचा: Parrot and Myna Wedding: ऐकावे ते नवलंच! चक्क पोपट आणि मैनेचा लावला विवाह; थाटामाटात पार पडला सोहळा)
सरकारच्या या आदेशानंतर ढाबा हॉटेल व्यवसायावर मोठा परिणाम होण्याची भीती ढाबा मालकांना आहे. दरम्यान, केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या (CPC) अहवालानुसार, ग्वाल्हेरचा AQI 329 वर पोहोचला आहे, तर भोपाळचा 299, कटनी 263, पिथमपूर 260, मंडीदीप 260, जबलपूर 214, सिंगरौली 253 आणि उज्जैनचा हवा गुणवत्ता निर्देशांक 181 वर पोहोचला आहे.