Swiggy भारतातील 125 शहरांमध्ये घरपोच देणार किराणामालाची सुविधा

सध्या स्विगीच्या अ‍ॅपमध्येच ‘Grocery' टॅबच्या खाली नागरिकांना किराणामाल घरपोच देण्यासाठी खास सुविधा करण्यात आली आहे.

Swiggy (Photo Credits: PTI)

मुंबईसह देशभरात सध्या कोरोना व्हायरसचं संकट आटोक्यात ठेवण्यासाठी लॉकडाऊन जाहीर करण्यात आला आहे. याकाळात लोकांना केवळ जीवनावश्यक वस्तूंची म्हणजे भाजीपाला, दूध, फळं आणि औषधं यांची खरेदी करण्यासाठी बाहेर पडण्याची मुभा आहे. दरम्यान दिवसागणिक देशात वाढणार्‍या कोरोनाग्रस्तांची संख्या पाहता आता स्विगी हे फूड डिलेव्हरी अ‍ॅप आता देशभरात 125 शहरांमध्ये घरातील जीवनावश्यक वस्तू, किराणामाल यांची डिलेव्हरी देण्यासाठी सज्ज झालं आहे. सध्या स्विगीच्या अ‍ॅपमध्येच ‘Grocery' टॅबच्या खाली नागरिकांना किराणामाल घरपोच देण्यासाठी खास सुविधा करण्यात आली आहे. दरम्यान मोठ्या ब्रॅन्डच्या वितरकांकडून किराणामालाची ही घरपोच सेवा दिली जाणार आहे.

Swiggy चे COO विवेक सुंदर यांनी दिलेल्या माहितीनुसार, भारतामधील या कठीण प्रसंगात अधिकाधिक लोकांना घरामध्येच सुरक्षित ठेवता यावं यासाठी आम्ही किराणामाल घरपोच देणारे आणि विकत घेणारे अशा दोन्हींच्या सुरक्षिततेची काळजी घेऊन नवी सेवा सुरू करत आहोत. आता युजर्सना त्यांच्या परिसरातील दुकानांच्या विविध पर्यायांमधून किराणामालाचे वेगवेगळे पर्याय पाहता येतील. दरम्यान हे व्यवहार प्रिपेड असून ' नो कॉन्टॅक्ट' डिलेव्हरी देण्याचा पर्याय त्यामध्ये असेल.

स्विगीने आता विशाल मेगा मार्ट, सिपला, डाबर, गोदरेज यांच्यासारख्या बड्या कंपन्यांसोबत टाय अप केले आहे. त्यामुळे यांच्या माध्यमातून अत्यावश्यक वस्तूंचा पुरवठा करण्यास मदत होणार आहे.

स्विगीने आता लॉकडाऊनच्या काळात ‘Swiggy Hunger Savior Covid Relief Fund'हा कार्यक्रमदेखील जाहीर केला आहे. याच्या माध्यमातून समाजातील या लॉकडाऊनच्या काळात रस्त्यावर राहणार्‍या अनेक गोर गरिबांना, रोजंदारीवर पोट असणार्‍या, परराज्यातून आलेल्या मजूरांची भूक भगावली जाणार आहे.