Swiggy Instamart: कंडोम, कांदे, मखाना... 2023 मध्ये भारतीयांनी सर्वात जास्त ऑर्डर केल्या 'या' गोष्टी; स्विगी इंस्टामार्टने जारी केला रिपोर्ट

2023 मध्ये मखानासाठी 1.3 दशलक्षाहून अधिक ऑर्डर प्राप्त झाल्या होत्या.

Swiggy, Biryani (Photo Credit - Wikimedia commons, Pixabay)

येत्या काही दिवसांत 2023 संपणार आहे आणि या निमित्ताने स्विगी इन्स्टामार्टने (Swiggy Instamart) आपला वार्षिक अहवाल 'क्विक कॉमर्स ट्रेंड्स' जारी केला आहे. या अहवालात ग्राहकांच्या काही मनोरंजक आणि आश्चर्यकारक गोष्टी नमूद केल्या आहेत. स्विगी इंस्टामार्टने आपल्या वार्षिक अहवालात म्हटले आहे की, व्हॅलेंटाईन वीक साजरा होणारा फेब्रुवारी हा रोमान्सचा महिना नाही, तर भारतामधील लोकांनी यंदा सप्टेंबरमध्ये सर्वाधिक प्रणय केला कारण या महिन्यात कंडोमची सर्वाधिक विक्री झाली. यासह एका दिवसात कंडोमची सर्वाधिक विक्री ही 12 ऑगस्टला झाली. या दिवशी स्विगीने कंडोमची 5,893 पाकिटे विकली.

स्विगीने आपल्या आठव्या वार्षिक ट्रेंडच्या अहवालात म्हटले आहे की, किराणा आणि भाजीपाला श्रेणींमध्ये लोकांनी कांदा, टोमॅटो आणि कोथिंबीरच्या सर्वात जास्त ऑर्डर दिल्या आहेत. कांद्यानंतर दूध, दही या दोन गोष्टी इन्स्टामार्टवर सर्वाधिक सर्च केल्या गेल्या.

अहवालात अनेक रंजक गोष्टींचाही उल्लेख करण्यात आला आहे. चेन्नईतील एका व्यक्तीने सर्वात मोठी ऑर्डर दिली. त्याने कॉफी, ज्यूस, कुकीज, नाचो आणि चिप्सवर 31,748 रुपये खर्च केले. जयपूरच्या एका व्यक्तीने एकाच दिवसात 67 ऑर्डर देऊन विक्रम केला आहे. दिल्लीतील एका दुकानदाराने एका वर्षात किराणा मालावर 12,87,920 रुपये खर्च करून, 1,70,102 रुपये वाचवले आहेत. कंपनीने असा दावा केला आहे की, वर्षातील सर्वात जलद डिलिव्हरी दिल्लीमध्ये होती, जिथे इन्स्टंट नूडल्सचे पॅकेट 65 सेकंदात वितरित केले गेले. (हेही वाचा: Pani Puri Cake: महिलेने बनवला पाणीपुरी केक; संतप्त नेटिझन्स म्हणाले, 'देव कधीच माफ करणार नाही)

स्विगीने आपल्या अहवालात म्हटले आहे की, हेल्दी फूडची मागणी वाढत आहे व त्यासाठी मखाना हा पसंतीचा पर्याय बनला आहे. 2023 मध्ये मखानासाठी 1.3 दशलक्षाहून अधिक ऑर्डर प्राप्त झाल्या होत्या. फळांच्या बाबतीत सर्वाधिक ऑर्डर आंब्याला मिळाली. भारतीय शहरांमधील आंबा प्रेमींसाठी बंगळुरू हे प्रमुख केंद्र म्हणून उदयास आले. दुसरीकडे स्विगीवर सलग आठव्या वर्षी सर्वाधिक ऑर्डर केलेल्या डिश म्हणून बिर्याणी शीर्षस्थानी आहे. प्लॅटफॉर्मला 2023 मध्ये प्रति सेकंद बिर्याणीच्या 2.5 ऑर्डर मिळाल्या. प्रत्येक सहाव्या बिर्याणीची ऑर्डर हैदराबादमधून दिली जात होती.