मुलांचे अपहरण आणि बलात्काराच्या आरोपानंतर वादग्रस्त बाबा 'स्वामी नित्यानंद' देश सोडून फरार; शोध सुरु
त्याला परत आणण्यासाठी पोलिसांनी परराष्ट्र मंत्रालयाशी संपर्क साधला आहे. आरोपी नित्यानंद यांच्यावर कर्नाटकातही बलात्काराचा गुन्हा दाखल आहे.
वादग्रस्त स्वयंभू बाबा नित्यानंद (Swami Nithyananda) देश सोडून पळून गेल्याची माहिती मिळत आहे. नित्यानंद कॅरिबियन देश त्रिनिदाद आणि टोबॅगोमध्ये असल्याचे सांगितले जात आहे. आश्रमात अल्पवयीन मुले व मुलींना बांधक बनवून ठेवल्याबद्दल गुजरात पोलिसांनी त्याच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे. आश्रमातून दोन महिला कर्मचार्यांच्या अटकेनंतर नित्यानंद देश सोडून फरार झाल्याची माहिती समोर आली आहे. त्याला परत आणण्यासाठी पोलिसांनी परराष्ट्र मंत्रालयाशी संपर्क साधला आहे. आरोपी नित्यानंद यांच्यावर कर्नाटकातही बलात्काराचा गुन्हा दाखल आहे.
याबाबत बोलताना मंत्रालयाचे प्रवक्ते रवीशकुमार यांनी गुरुवारी सांगितले की, ‘नित्यानंद भारत सोडून पळून गेला आहे याबाबत गृह मंत्रालयाकडून कोणतीही अधिकृत माहिती देण्यात आली नाही. तो कोणत्या देशात पळून गेला आहे याचीही माहिती नाही. आम्ही त्याचे सध्याचे लोकेशन आणि नागरिकत्व याची माहिती गोळा प्राप्त करण्याचा प्रयत्न करीत आहोत. त्यानंतरच नित्यानंदला परत आणण्याची प्रक्रिया सुरू करता येईल.’
अहमदाबाद (ग्रामीण) चे पोलीस अधीक्षक एसवी अंसारी यांनी दिलेल्या माहितीनुसार, नित्यानंदला आता शोधणे म्हणजे वेळेचा अपव्यय असेल, त्यामुळे जेव्हा तो भारतात परत येईल तेव्हा त्याला अटक केली जाईल. अहमदाबादमध्ये नित्यानंद योगिनी सर्वज्ञानपीठमच्या नावाने आपला आश्रम चालवतो. गुरुवारी पोलिसांनी या आश्रमातून दोन महिला अनुयायी साध्वी प्राण प्रियानंद आणि प्रियत्त्व रिद्धी किरण यांनाही अटक केली आहे. (हेही वाचा: स्वयंभू बाबा स्वामी नित्यानंदविरोधात अपहरणाचा गुन्हा दाखल; मुलींना बंदी बनवून केले जात होते अत्याचार)
यादरम्यान नित्यानंदच्या आश्रमावर छापा टाकून चार लॅपटॉप, टॅबलेट्स 43 गोळ्या, पेन ड्राईव्ह आणि अनेक मोबाईल जप्त केले आहेत. मुलांचे अपहरण केल्याचा, अनुयायांकडून निधी गोळा करण्यासाठी त्यांना बंधक म्हणून वापरल्याचा तसेच त्यांच्यावर अत्याचार केल्याचा आरोप करीत बुधवारी नित्यानंदविरोधात तक्रार दाखल केली गेली आहे.