अभिनेता सुशांत सिंह राजपूत राजपूत आत्महत्या प्रकरणामध्ये बॉलिवूड आणि डॉन चा संबंध असल्याचा डॉ. सुब्रमण्यम स्वामी यांचा दावा; PM मोदी यांना पत्र लिहून CBI चौकशीची मागणी
त्यामुळे हा मृत्यू आत्महत्या दाखवला जात आहे.
अभिनेता सुशांत सिंह राजपूत याच्या मृत्यूला आता महिना उलटला आहे. मात्र अद्याप त्याच्या आत्महत्येचं कारण समजू शकलेले नाही. आता माजी मंत्री डॉ. सुब्रमण्यम स्वामी यांनी बुधवार (15 जुलै) दिवशी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहून त्याबाबत सीबीआय चौकशी व्हावी अशी मागणी केली आहे. दरम्यान सुशांत सिंह राजपूत यांची आत्महत्या भासवली जात आहे असा दावा देखील त्यांनी पत्रामध्ये केला असून बॉलिवूडमधील मोठ्या व्यक्ती मुंबई पोलिसांवर दुबईमधील काही डॉनचा माध्यमातून दबाव टाकत आहेत. त्यामुळे हा मृत्यू आत्महत्या दाखवला जात आहे.
दरम्यान काही दिवसांपूर्वी सुब्रमण्यम स्वामी यांनी मुंबई पोलिस कमिशनर यांना देखील पत्र लिहून सारे इलेक्ट्रॉनिक पुरावे फ़ॉरेंसिक एक्झामसाठी पाठवले जावेत अशी विनंती केली आहे. हे पत्र त्यांच्या वकिलांमार्फत देण्यात आले होते. सोबतच आता रिया चक्रवर्ती या सुशांत सिंह राजपूतच्या गर्लफ्रेंडने देखील सोशल मीडियाच्या माध्यमातून केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना या प्रकरणाची चौकशी सीबीआयकडून व्हावी अशी मागणी केली होती.
डॉ. सुब्रमण्यम यांचे पत्र
दरम्यान डॉ. सुब्रमण्यम यांच्यासोबतच शेखर सुमन. भाजपा आमदार रूपा गांगुली यांनी सीबीआय चौकशीची मागणी केली होती. मुंबई पोलिसांकडून सिनेसृष्टीतील अनेक कलाकार मंडळी, कास्टिंग डिरेक्टर सह सुशांतच्या मॅनेजर टीममधील व्यक्तींचा जबाब नोंदवला जात आहे.
सुशांत सिंह राजपूतने 14 जून दिवशी राहत्या घरी गळफास घेत आत्महत्या केली होती. त्यावेळेस तो मागील काही महिने नैराश्यात होता आणि उपचार घेत असल्याचे सांगण्यात आले होते.