Shree Ram Mandir Ayodhya: भक्तांची प्रतीक्षा संपली; अयोध्येतील राम दरबार दर्शनासाठी खुला, जाणून घ्या वेळा, पास बुकिंग आणि इतर माहिती
श्री राम जन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्टच्या निर्णयानुसार, भक्तांना आता भगवान राम, सीता, लक्ष्मण, भरत, शत्रुघ्न आणि हनुमान यांच्या मूर्तींचे दर्शन घेता येणार आहे. 5 जून 2025 रोजी राम दरबाराची प्राणप्रतिष्ठापना झाली.
अयोध्येतील (Ayodhya) श्री राम मंदिर (Shree Ram Mandir) हे केवळ धार्मिक स्थळच नाही, तर भारतीय संस्कृती आणि आस्थेचे प्रतीक आहे. आता अयोध्येतील या भव्य राम मंदिरात प्रथम मजल्यावर स्थापित झालेला राम दरबार 14 जून 2025 पासून भक्तांसाठी खुला करण्यात आला आहे. श्री राम जन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्टच्या निर्णयानुसार, भक्तांना आता भगवान राम, सीता, लक्ष्मण, भरत, शत्रुघ्न आणि हनुमान यांच्या मूर्तींचे दर्शन घेता येणार आहे. 5 जून 2025 रोजी राम दरबाराची प्राणप्रतिष्ठापना झाली असून, राम जन्मभूमी परिसरात नव्याने बांधलेल्या आठ मंदिरांसह हा एक महत्त्वाचा टप्पा आहे.
दर्शनाच्या वेळा-
राम दरबार दर्शनासाठी मंदिर सकाळी 7:00 ते रात्री 9:00 या वेळेत खुले आहे. या कालावधीत, भक्तांसाठी सहा दर्शन स्लॉट्स उपलब्ध आहेत: सकाळी 7:00 ते 9:00, 9:00 ते 11:00, दुपारी 1:00 ते 3:00, 3:00 ते 5:00, 5:00 ते 7:00 आणि 7:00 ते 9:00. प्रत्येक स्लॉटसाठी 300 पास उपलब्ध आहेत, ज्यापैकी 150 पास मंदिर ट्रस्टकडे आणि 150 पास स्थानिक प्रशासनाकडे असतात. यामध्ये 100 पास 'स्पेशल दर्शन' साठी आणि 50 पास 'सुलभ दर्शन' साठी आहेत.
बुकिंग पास माहिती-
पास मिळवण्यासाठी भक्तांना श्री राम जन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्टच्या अधिकृत वेबसाइटवर (srjbtkshetra.org) नोंदणी करावी लागेल. यासाठी नाव, वय, आधार कार्ड, मोबाइल नंबर आणि शहर यांसारख्या माहितीची आवश्यकता आहे. पास विनामूल्य असून, कोणत्याही विशेष दर्शनासाठी शुल्क आकारले जात नाही. ट्रस्टने भक्तांना सावध केले आहे की, कोणीही विशेष दर्शनाच्या नावाखाली पैसे मागितल्यास तो फसवणुकीचा प्रयत्न असू शकतो.
राम दरबार मंदिराच्या पहिल्या मजल्यावर आहे, जिथे भगवान राम यांच्यासह सीता, लक्ष्मण, भरत, शत्रुघ्न आणि हनुमान यांच्या मूर्ती आहेत. याशिवाय, मंदिर परिसरात आठ नवीन मंदिरे बांधली गेली आहेत, ज्यामध्ये ईशान्य दिशेला शिव, आग्नेय दिशेला गणेश, दक्षिणेला हनुमान, नैऋत्य दिशेला सूर्य, वायव्य दिशेला भगवती आणि उत्तरेला अन्नपूर्णा यांच्या मूर्तींची प्रतिष्ठापना झाली आहे.
मंदिरातील नियम-
मंदिरात प्रवेशापूर्वी भक्तांनी काही नियमांचे पालन करणे आवश्यक आहे. मोबाइल फोन, पादत्राणे, पर्स, फुले, हार आणि प्रसाद मंदिर परिसरात आणण्यास मनाई आहे. भक्तांनी पारंपरिक पोशाख परिधान करावा, जसे की पुरुषांसाठी धोतर किंवा पँट-शर्ट आणि महिलांसाठी साडी, सलवार-कमीज. मंदिर परिसरात व्हीलचेअरची सुविधा वृद्ध आणि अपंग भक्तांसाठी उपलब्ध आहे, जी विनामूल्य आहे, परंतु स्वयंसेवकाला नाममात्र शुल्क द्यावे लागेल. मंदिरात फोटोग्राफी आणि व्हिडिओग्राफीला परवानगी नाही, ज्यामुळे मंदिरातील पवित्र वातावरण कायम राहील. (हेही वाचा: Snana Yatra 2025: पुरी जगन्नाथ रथयात्रेपूर्वी विधींना सुरूवात; देवास्नान पौर्णिमेनेला भगवान जगन्नाथ, भगवान बलभद्र आणि देवी सुभद्रा यांचे औपचारिक स्नान)
राम मंदिरात मंगला आरती (सकाळी 4:00), श्रृंगार आरती (सकाळी 6:15) आणि शयन आरती (रात्री 10:00) यांसारख्या विशेष आरतींसाठी पास आवश्यक आहे. हे पास विनामूल्य असून, ऑनलाइन किंवा मंदिराच्या कॅम्प कार्यालयातून मिळू शकतात. भक्तांना आरतीच्या 30 मिनिटे आधी उपस्थित राहावे लागेल. दरम्यान, मंदिरात गर्दी टाळण्यासाठी आठवड्याच्या मधल्या दिवसांत किंवा गैर-सणासुदीच्या काळात भेट देण्याचा सल्ला दिला जातो.
(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)