Shocking: सावत्र मुलगा आणि पतीच्या मित्रांनी केला महिलेवर बलात्कार; पीडितेची राष्ट्रपतींकडे इच्छामरणाची मागणी, म्हणाली- 'न्याय मिळेल असे वाटत नाही'
त्यामुळे मला तुमच्या (राष्ट्रपतींच्या) परवानगीने माझे जीवन संपवायचे आहे.’
उत्तर प्रदेशातील (Uttar Pradesh) एका महिलेने देशाच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू (President Droupadi Murmu) यांना पत्र लिहून इच्छामरणाची (Euthanasia) परवानगी मागितली आहे. या 30 वर्षीय महिलेचा आरोप आहे की, तिच्या सावत्र मुलाने आणि पतीच्या मित्रांनी अनेकवेळा तिच्यावर बलात्कार (Rape) केला आहे. आता याबाबत न्याय मिळण्याच्या सर्व आशा संपल्यावर तिने इच्छामरणाची परवानगी मागितली आहे. 9 ऑक्टोबर रोजी पूरनपुर कोतवाली पोलीस ठाण्यात एफआयआर दाखल करूनही पोलिसांनी जाणीवपूर्वक एकाही आरोपीला अटक केली नाही, असा आरोपही तिने केला आहे.
महिलेच्या म्हणण्यानुसार, घटस्फोट घेतल्यानंतर तिने तीन वर्षांपूर्वी चंदीगडमधील एका 55 वर्षीय शेतकऱ्याशी लग्न केले, जोही घटस्फोटितही आहे. तिच्या सावत्र मुलाने एप्रिलमध्ये तिच्याशी अवैध संबंधासाठी संपर्क साधला आणि तेव्हापासून त्याने तिच्यावर वारंवार लैंगिक अत्याचार केले गेले. पुढे ती गरोदर राहिल्यावर पुरणपूर येथील खासगी रुग्णालयात तिचा गर्भपात करण्यास भाग पाडण्यात आले.
पीडितेने पुढे सांगितले की, 18 जुलै रोजी तिला तिच्या पतीच्या मित्राच्या फार्महाऊसवर नेण्यात आले, तिथे तिच्या एका नातेवाईकाने आणि दोन साथीदारांनी तिच्यावर बलात्कार केला. त्यानंतर तिने याबाबत पोलिसात धाव घेतली, परंतु स्थानिक पोलीस आणि इतर वरिष्ठ अधिकाऱ्यांनी तिच्या लेखी तक्रारीकडे दुर्लक्ष केले. त्यानंतर तिने कोर्टात धाव घेतली, जिथे पोलिसांना एफआयआर नोंदवण्याचे आदेश देण्यात आले.
याबाबत पुरनपूर कोतवाली पोलीस ठाण्यात अलीकडेच एफआयआर नोंदवण्यात आला आणि तिचा नवरा, सावत्र मुलासह पाच जणांवर आयपीसी कलम 376-डी (सामूहिक बलात्कार), 323, 504, 506 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला. मात्र कोणालाही अटक करण्यात आलेली नाही. यानंतर महिलेने राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना पत्र लिहून इच्छामरणाची परवानगी मागितली आहे.
आपल्याला वारंवार जीवे मारण्याच्या धमक्या येत असल्याचे तिने आपल्या पत्रात म्हटले आहे. तिने पत्रात लिहिले आहे की, ‘मी खूप संघर्ष केला आहे आणि मला न्याय मिळेल असे वाटत नाही. त्यामुळे मला तुमच्या (राष्ट्रपतींच्या) परवानगीने माझे जीवन संपवायचे आहे.’ ही महिला सध्या तिची आई, भाऊ आणि सहा वर्षांच्या मुलासोबत बरेली येथे राहते. (हेही वाचा: Murder: शेजारी राहणाऱ्या महिलेच्या प्रेमात पडला तरुण, प्रेमसंबंधात अडथळा ठरणाऱ्या पतीचा केली हत्या)
याबाबत पोलीस अधीक्षक दिनेश कुमार प्रभू म्हणाले, ‘तथ्ये आणि पुराव्यांसह ही एक गुंतागुंतीची बाब आहे. आम्ही निष्पक्ष तपास करत आहोत आणि तो लवकरच पूर्ण केला जाईल. त्यानंतर त्यानुसार कारवाई केली जाईल.’ पोलीस सध्या या प्रकरणाचा तपास करीत आहेत.