Shocking! पोटच्या 15 दिवसांच्या मुलाला विकून आईने विकत घेतले फ्रीज, टीव्ही, वॉशिंग मशिन; 5 लाखांमध्ये झाला सौदा

यामध्ये सर्व महिलांचा वाटा होता. शायनाला तिच्या वाट्याचे दोन लाख 70 हजार रुपये मिळाले

Baby (Photo Credits; Pixabay) (Representational image Only)

‘माता ही कधीच कुमाता होऊ शकत नाही’, हेच वचन आपण आतापर्यंत ऐकत आलो आहोत. परंतु वेळ पडली तर आई ही आपल्या पोटच्या मुलाबाबत किती क्रूर होऊ शकते याचे एक उदाहरण मध्य प्रदेश (Madhya Pradesh) मधून समोर आले आहे. या ठिकाणी सुखसोयी आणि चैनीच्या वस्तू विकत घेण्यासाठी कलियुगी मातेने आपल्या 15 दिवसांच्या निष्पाप मुलाला विकले आहे. मुलाला विकून मिळालेल्या पैशात या महिलेने फ्रीज, कुलर, टीव्ही, वॉशिंग मशिन, बाईक अशा गोष्टी विकत घेतल्या.

हे लाजिरवाणे आणि धक्कादायक प्रकरण मध्य प्रदेशातील इंदूर जिल्ह्यातील हिरानगर पोलीस ठाण्याचे आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अंतर सिंग उर्फ ​​विशाल आणि शायना यांचे इंदूरच्या गौरी नगर भागात लग्न झाले होते. हे त्यांचे दुसरे लग्न होते. विशाल हा मजूर आहे तर शायना घरकाम करते. जेव्हा शायना गरोदर राहिली तेव्हा तिला शंका आली की हे मूल कदाचित तिच्या पहिल्या पतीचे असू शकते. त्यामुळे या मुलाला विकण्याचा निर्णय तिने घेतला.

शायना ज्या घरात भाड्याने राहत होती ते घर नेहा सूर्यवंशी नावाच्या महिलेचे आहे. मुलाला विकण्याबाबत शायना नेहाशी बोलली होती. यासाठी नेहाने भगीरथपुरा, इंदूर येथे राहणाऱ्या पूजा वर्मा, नेहा वर्मा आणि नीलम वर्मा अशा दलाल महिलांची मदत घेतली. या तिघींनी देवास येथील लीना नावाच्या महिलेची ओळख करून दिली. लीनाला मूल हवे होते. शायनाची डिलिव्हरी झाल्यानंतर काही दिवसांनी दलाल महिलांच्यामार्फत मुलगा लीनापर्यंत पोहोचवण्यात आला.

इंदूरमधील हिरानगर पोलीस स्टेशनचे एसएचओ सतीश पटेल यांनी दिलेल्या माहितीनुसार, शायनाच्या मुलाचा सौदा साडेपाच लाख रुपयांमध्ये झाला होता. यामध्ये सर्व महिलांचा वाटा होता. शायनाला तिच्या वाट्याचे दोन लाख 70 हजार रुपये मिळाले. या मुलाला विकून चैनीच्या वस्तू खरेदी करण्याची शायना आणि विशालची योजना होती. या पैशांमध्ये त्यांनी फ्रीज, कुलर, टीव्ही, वॉशिंग मशिन आणि बाईक इत्यादी गोष्टी खरेदी केल्या. हा सर्व प्रकार शेजारील एका व्यक्तीच्या लक्षात येताच त्याने पोलिसांना माहिती दिली. (हेही वाचा: Shocking! पोटच्या मुलीवर आई प्रियकराकडून करवत असे बलात्कार; गरोदर राहिल्यानंतर तिच्या स्त्रीबिजांचा होत होता सौदा)

यानंतर पोलिसांनी त्यांच्या स्तरावर प्रकरणाचा तपास केला. प्रकरणाची सत्यता पडताळल्यानंतर त्यांनी सर्वप्रथम, मुलाला सुखरूपपणे ताब्यात घेतले. त्यानंतर आतापर्यंत एकूण आठ जणांना अटक करण्यात आली. या प्रकरणाचा बाल तस्करीशी संबंध आहे का, याचाही तपास पोलीस करत आहेत.