Shocking! 78 वर्षीय महिलेचा 82 वर्षीय पतीवर हुंड्यासाठी छळ केल्याचा आरोप; मुलगा, सुनेसह 6 जणांविरुद्ध गुन्हा दाखल
लग्नाच्या इतक्या वर्षांनी हुंड्यासाठी छळ केल्याच्या आरोपात काहीच अर्थ नाही.
महिलांना त्यांचे सामाजिक हक्क मिळवून देण्यासाठी आणि त्यांच्या संरक्षणासाठी केलेल्या हुंडाबळी कायद्याचा (Dowry System) गैरवापर हा नेहमीच चर्चेचा विषय राहिला आहे. पुन्हा एकदा असे विचित्र प्रकरण समोर आले आहे, ज्यामुळे हुंडा छळ प्रतिबंधक कायद्यावर प्रश्न उपस्थित केले जात आहेत. उत्तर प्रदेशातील (Uttar Pradesh) कानपूरमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. इथे एका 78 वर्षीय महिलेने तिच्या 82 वर्षीय पतीवर हुंड्यासाठी छळ केल्याचा आरोप केला आहे. महिलेने पतीवर मारहाणीचा आरोपही केला आहे.
ही घटना शहरातील चाकेरी भागातील आहे. 82 वर्षीय गणेश नारायण शुक्ला, त्यांचा मुलगा रजनीश, सून यांच्यासह सहा जणांविरुद्ध गणेश यांच्या 78 वर्षीय पत्नीने हुंड्यासाठी छळ, मारहाण आणि धमकावल्याचा आरोप करत चाकेरी पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. आपला पती, मुलगा आणि सुन हे आपल्यावर हुंडा आणण्यासाठी दबाव टाकत आहेत, आपल्याला खाऊ-पिऊ देत नाही, मारहाण करतात आणि जीवे मारण्याची धमकी देतात असा आरोप पत्नीने केला आहे.
महिलेची तक्रार लक्षात घेऊन पोलिसांनी चौकशी केली असता हे प्रकरण कौटुंबिक वादाचे असल्याचे समजले, मात्र आरोपीवर कारवाई करण्यासाठी महिला ठाम होती. त्यावर पोलिसांनी हे प्रकरण मध्यस्थी केंद्राकडे पाठवले. मध्यस्थी केंद्राकडून नोटीस बजावून सासरच्या मंडळींना बोलावण्यात आले. गणेश मध्यस्थी केंद्रात आपली बाजू मांडण्यासाठी आला असता तो तिथे ढसाढसा रडू लागला व त्याने हे आरोप नाकारले. (हेही वाचा: Murder: गुरुग्राममध्ये दारुच्या नशेत एका व्यक्तीकडून पत्नी, मुलीची हत्या, आरोपी फरार)
आपल्या आईला भडकावून काही लोकांना कुटुंबात फूट पाडून आपला स्वार्थ सिद्ध करायचा आहे, त्यामुळे खोटे आरोप केले जात असल्याचे मुलाचे म्हणणे आहे. मुलाला आईबाबत कोणतीही तक्रार नाही. मध्यस्थी केंद्राच्या समुपदेशकाकडून हे प्रकरण सामंजस्याने मिटवण्याचे प्रयत्न सुरू आहेत.
दरम्यान, अधिवक्ता शिवेंद्र कुमार पांडे यांनी सांगितले की, जे तथ्य समोर आले आहे त्यानुसार कुटुंबातील सदस्यांना मुद्दाम गोवण्यासाठी हुंडा कायद्याचा गैरवापर केला जात आहे. लग्नाच्या इतक्या वर्षांनी हुंड्यासाठी छळ केल्याच्या आरोपात काहीच अर्थ नाही.