SSC, HSC Board Exams 2021 देणार्या विद्यार्थ्यांनाही परिक्षेपूर्वी कोरोनाची लस देण्याची शिवसेनेची लोकसभेत मागणी
या परीक्षा ऑफलाईन माध्यमातून घेण्यावर शिक्षण मंडळ ठाम आहे त्यासाठी राज्यभर तयारी देखील सुरू करण्यात आली आहे.
महाराष्ट्रामध्ये मागील काही दिवसांमध्ये झपाट्याने होत असलेल्या कोरोना रूग्णांची वाढ पाहता आता लसीकरणाला वेग देण्यात आला आहे. 1 एप्रिल पासून देशभरात 45 वर्षावरील लोकांना लस देण्यात येणार आहे. यामध्येच आता एप्रिल महिन्यापासून राज्यात महाराष्ट्र राज्य बोर्डाच्या 10वी, 12वीच्या परीक्षा पाहता या विद्यार्थ्यांना देखील लस देण्याची मागणी शिवसेना खासदार राहुल शेवाळे (SHiv Sena MP Rahul Shewale) यांनी केली आहे. लोकसभेच्या शून्य प्रहरामध्ये बोलताना त्यांनी विद्यार्थ्यांच्या लसीकरणाचा मुद्दा उपस्थित केला असून केंद्र सरकारने सार्या राज्यांना त्याबाबत तातडीचे आदेश देण्याची मागणी करण्यात आली आहे.
दरम्यान यंदा एप्रिल महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात 10वी, 12वीची परीक्षा सुरू होणार आहे. या परीक्षा ऑफलाईन माध्यमातून घेण्यावर शिक्षण मंडळ ठाम आहे त्यासाठी राज्यभर तयारी देखील सुरू करण्यात आली आहे. पण आजही अनेक विद्यार्थी, शिक्षक, पालकांच्या मनात कोरोनाबाबत भीती आहे.
महाराष्ट्रात यंदा 10 वी साठी 13 लाख तर 12 वी साठी 16 लाख विद्यार्थी परीक्षेला बसणार आहेत. राज्य बोर्ड परीक्षेसोबत आयसीएसइ आणि आयएससी परिक्षेसाठीही अनुक्रमे 12 हजार आणि 23 हजार विदयार्थी सामोरे जाणार आहेत.तसेच सीबीएससीच्या विद्यार्थ्यांची संख्याही मोठी आहे. ज्या विद्यार्थ्यांना काही कारणास्तव परीक्षेला उपस्थित राहता येणार नाही, त्यांना 15 दिवसांची मुदत देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मात्र, या परीक्षेला येणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या लक्षात घेता पालकांची चिंता आता वाढली आहे. पण पालकांना, विद्यार्थ्यांना निर्धास्त करायचे असल्यास आणि त्यांच्या शैक्षणिक वर्षाचे नुकसान टाळायचे असेल तर विद्यार्थ्यांना लस देण्याची मागणी पुढे येत आहे.
महाराष्ट्र राज्यात काल रात्री देण्यात आलेल्या माहितीनुसार, मागील 24 तासांमध्ये 31,855 कोरोना बाधीत रुग्णांची वाढ झाली आहे.एकूण 2262593 रुग्ण बरे होऊन आतापर्यंत घरी पाठविण्यात आले आहेत. तर राज्यात सध्याच्या घडीला एकूण 247299 अॅक्टिव्ह रुग्ण आहेत.राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण आता 88.21% झाले आहे. मुंबई मध्ये काल आतापर्यंतची मागील वर्षभरातील उच्चांकी रूग्णसंख्येची नोंद करण्यात आली आहे. मुंबईत काल 5 हजारांपेक्षाही अधिक कोरोना बाधित रूग्ण आढळले आहेत.