Delhi Violence: 'दिल्ली हिंसाचारावेळी शाहरुखने रागाच्या भरात केला होता गोळीबार, त्याची गुन्हेगारी पार्श्वभूमी नाही'; दिल्ली पोलिसांची माहिती

दिल्लीच्या (Delhi) ईशान्य भागात 24 फेब्रुवारी रोजी झालेल्या हिंसक घटनांमध्ये, मौजपूर येथे गोळीबार करणाऱ्या शाहरुखला (Shahrukh) आज (मंगळवार) उत्तर प्रदेशातील शामली येथून अटक करण्यात आली आहे.

Delhi Police (Photo Credits: IANS)

दिल्लीच्या (Delhi) ईशान्य भागात 24 फेब्रुवारी रोजी झालेल्या हिंसक घटनांमध्ये, मौजपूर येथे गोळीबार करणाऱ्या शाहरुखला (Shahrukh) आज (मंगळवार) उत्तर प्रदेशातील शामली येथून अटक करण्यात आली आहे. शाहरुखला दिल्ली पोलिसांच्या गुन्हे शाखेच्या पथकाने आणि यूपी पोलिसांच्या संयुक्त पथकाने अटक केली आहे. अटकेनंतर त्याला दिल्लीला आणण्यात आले तेथे त्याची चौकशी करण्यात आली.

याबाबत पत्रकार परिषदेत दिल्ली पोलिसांचे अतिरिक्त पोलिस आयुक्त अजितकुमार सिंगला (Ajit Kumar Singla) यांनी माहिती दिली. शाहरुख शामली येथूनही फरार होण्याचा मार्गावर होता, असे त्यांनी सांगितले.

24 फेब्रुवारी रोजी झालेल्या हिंसाचारादरम्यान गोळीबार केल्याचा आरोपी शाहरुखला, आयटीओ स्थित गुन्हे शाखेच्या मुख्यालयात आणण्यात आले आहे. पत्रकार परिषदेत अजितकुमार सिंगला म्हणाले की, 'हिंसाचाराच्या वेळी शाहरुखने रागाच्या भरात गोळीबार केला होता. त्याने वापरलेली पिस्तूल मिळवण्याचा आम्ही प्रयत्न करीत आहोत. शाहरुखने आम्हाला सांगितले की रागाच्या भरात त्यान निषेधाच्या वेळी गोळीबार केला. त्याच्यावर यापूर्वी कोणताही गुन्हेगारी रेकॉर्ड नाही, परंतु आमच्याकडे त्याच्या वडिलांविरूद्ध ड्रग आणि बनावट नोटा प्रकरणी गुन्हा नोंद आहे. आंदोलनावेळी तो एकटाच आला होता. याबाबत पुढील तपास सुरू आहे.'

सध्या त्याला कोर्टात हजर केले जाणार आहे, त्यानंतर चौकशी केली जाईल. शाहरुखने पळून जाण्यासाठी एस्टीम गाडी वापरली होती. पोलीस त्याची ताहिरच्या संबंधाबाबतही विचारपूस करणार आहेत. शाहरुख मॉडेलिंग करतो, टिकटॉक व्हिडिओ बनवतो तसेच जिमचीही त्याला आवड आहे. बीए सेकंड इयरपर्यंत त्याचे शिक्षण झाले आहे. चौकशी दरम्यान शाहरूखजवळील पिस्तूल बिहारच्या मुंगेर इथे बनवले असल्याचे समजले. त्याने आपल्या कारखान्यात काम करणाऱ्या माणसाकडून ते खरेदी केले होते. (हेही वाचा: दिल्लीतील हिंसाचाराला केंद्रातील भाजप सरकार जबाबदार; शरद पवार यांचा आरोप)

शाहरुखवर आयपीसी आणि शस्त्रास्त्र कायद्याच्या कलम 307 (खून करण्याचा प्रयत्न), 186 आणि 353 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गरज भासल्यास तपासणीदरम्यान इतर गुन्हे दाखल केले जाणार आहेत. दरम्यान, आतापर्यंत पूर्व दिल्लीतील हिंसाचारात 45 हून अधिक लोक मरण पावले आहेत. वेगवेगळ्या भागातील नाल्यांमधून अनेकांचे मृतदेह सापडले आहेत. हिंसाचार पसरवल्याच्या आरोपाखाली पोलिसांनी 800 हून अधिक लोकांना अटक केली आहे.