Sexual Harassment Case: लैंगिक छळाचा गुन्हा दाखल झाल्यानंतर हरियाणाचे क्रीडा मंत्री Minister Sandeep Singh यांचा राजीनामा; म्हणाले- 'माझी प्रतिमा खराब करण्याचा प्रयत्न'
संदीप सिंग हे व्यावसायिक फील्ड हॉकी खेळाडू आहेत. ते भारतीय राष्ट्रीय हॉकी संघाचा कर्णधारही होते.
चंदीगड पोलिसांनी शुक्रवारी एका कनिष्ठ अॅथलेटिक्स प्रशिक्षकाच्या तक्रारीच्या आधारे हरियाणाचे क्रीडा मंत्री संदीप सिंग (Haryana Sports Minister Sandeep Singh) यांच्याविरुद्ध लैंगिक छळ (Sexual Harassment) आणि गुन्हेगारी धमकीचा गुन्हा दाखल केला. सुरुवातीला मंत्र्यांनी हे आरोप निराधार असल्याचे सांगत ते फेटाळून लावले होते आणि स्वतंत्र चौकशीची मागणी केली होती. मात्र, आता गुन्हा दाखल झाल्यानंतर त्यांनी क्रीडामंत्री पदाचा राजीनामा दिला आहे. चंदीगडमधील सेक्टर 26 पोलीस स्टेशनमध्ये दाखल झालेल्या गुन्ह्यात आयपीसीच्या कलम 354, 354A, 354B, 342 आणि 506 लागू करण्यात आले आहेत. चंदिगड पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गुन्हा दाखल केल्यानंतर त्याचा तपास सुरू आहे.
आज आपला राजीनामा जाहीर करताना संदीप सिंग म्हणाले, ‘माझी प्रतिमा खराब करण्याचा प्रयत्न केला जात आहे. मला आशा आहे की माझ्यावर लावण्यात आलेल्या खोट्या आरोपांची सखोल चौकशी होईल. चौकशी अहवाल येईपर्यंत मी जबाबदारी सोपवणार आहे. क्रीडा खाते मुख्यमंत्र्यांकडे सोपवत आहे.’
ज्युनियर ऍथलेटिक्स प्रशिक्षकाने विरोधी पक्ष इंडियन नॅशनल लोक दल (INLD) च्या कार्यालयात पत्रकार परिषद घेत मनोहर लाल खट्टर सरकारने, संदीप सिंग यांना तात्काळ बडतर्फ करून विशेष चौकशी स्थापन करावी, असे सांगून राज्य सरकारकडे संरक्षणाची मागणी केली होती. ज्युनियर अॅथलेटिक्स कोचने सांगितले की संदीप सिंगने तिला आधी जिममध्ये पाहिले आणि नंतर तिच्याशी इन्स्टाग्रामवर संपर्क साधला.
त्यानंतर मंत्री तिला भेटण्याचा आग्रह करू लागले. कोचने सांगितले की, ‘संदीप सिंगने मला इंस्टाग्रामवर संदेश पाठवत सांगितले की, माझे राष्ट्रीय क्रीडा प्रमाणपत्र प्रलंबित आहे आणि त्यांना या संदर्भात भेटायचे आहे.’ त्यावर आपण कागदपत्रे घेऊन त्यांना भेटण्यासाठी त्यांच्या निवासस्थानी-कम-कॅम्प ऑफिसमध्ये गेलो. तिथे गेल्यानंतर मंत्र्याने आपल्यावर लैंगिक अत्याचार केला.’ प्रशिक्षकाने विनयभंगाच्या घटनेची तारीख 1 जुलै 2022 असल्याचे सांगितले आहे. मंत्र्यांच्या निवासस्थानाबाहेर ते सुखना तलावापर्यंत लावण्यात आलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची चौकशी करण्याची मागणीही तिने केली आहे. (हेही वाचा: धक्कादायक! दिवसाढवळ्या कारमध्ये शिरत महिलेच्या अपहरणाचा प्रयत्न, घटना सीसीटीव्हीत कॅमेरात कैद)
दरम्यान, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि हरियाणाचे माजी मुख्यमंत्री भूपिंदर सिंग हुड्डा यांनीही या प्रकरणाची निष्पक्ष चौकशी करण्याची मागणी केली आहे. संदीप सिंग हे व्यावसायिक फील्ड हॉकी खेळाडू आहेत. ते भारतीय राष्ट्रीय हॉकी संघाचा कर्णधारही होते. संदीप सिंह कुरुक्षेत्रातील पेहोवा येथून भाजपचे आमदार आहेत. 2018 मध्ये संदीप सिंगवर आधारित बायोपिकही रिलीज झाला होता.