Seema Haider to Contest The Election? पाकिस्तानमधून आलेली सीमा हैदर लढवणार 2024 ची निवडणूक; मोदी सरकारमधील 'या' पक्षाने दिली ऑफर
जर सीमाला आमच्या सुरक्षा यंत्रणांनी क्लीन चिट दिली आणि त्यांना भारतीय नागरिकत्व मिळाले तर सीमाचे पक्षात स्वागत केले जाईल.'
सचिनच्या प्रेमापोटी चार मुलांसह नेपाळमार्गे अवैधरित्या भारतात आलेल्या सीमा हैदर (Seema Haider) या पाकिस्तानी महिलेने भारतामध्ये चित्रपट साईन केला आहे. लवकरच ती अभिनेत्री बनणार असल्याची बातमी काही दिवसांपूर्वी आली होती. आता एका पक्षाने सीमाला त्यांच्या चिन्हावर निवडणूक लढवण्याची ऑफर दिली आहे. लवकरच सीमाची भारताच्या राजकारणात एन्ट्री होऊ शकते. अहवालानुसार, सीमा हैदर हिला एनडीएचा मित्रपक्ष असलेल्या रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाने (RPI) आणि केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी पक्षात येण्याचे निमंत्रण दिले आहे. सीमा हैदर हिने आरपीआयचे निमंत्रण स्वीकारल्याचे सांगण्यात येत आहे.
सीमाला पक्षाच्या महिला विभागाच्या अध्यक्षा बनवल्या जातील, असा पक्षाच्या पदाधिकाऱ्यांचा दावा आहे. यासोबतच तिची बोलण्याची शैली लक्षात घेऊन तिला पक्षाचा प्रवक्ताही करण्यात येणार आहे. मात्र यासाठी आधी सीमाला सुरक्षा यंत्रणांच्या तपासात क्लीन चिट मिळणे आवश्यक आहे.
याबाबत माहिती देताना रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष मासूम किशोर म्हणाले की, ‘सीमा हैदर या पाकिस्तानी नागरिक असून त्या भारतात आल्या आहेत. जर सीमाला आमच्या सुरक्षा यंत्रणांनी क्लीन चिट दिली आणि त्यांना भारतीय नागरिकत्व मिळाले तर सीमाचे पक्षात स्वागत केले जाईल. ज्याच्याकडे भारतीय नागरिकत्व आहे तो कुठेही निवडणूक लढवू शकतो असा बाबासाहेबांनी केलेला कायदा आहे.’
मासूम पुढे म्हणाले की, ‘आतापर्यंतच्या तपासात त्यांच्यावर कोणताही आरोप सिद्ध झालेला नाही. त्यांना सुरक्षा यंत्रणांकडून क्लीन चिट मिळाल्यास, त्या चांगल्या वक्ता असल्याने आम्ही त्यांना प्रवक्ताही बनवू. त्यांना भारताचे नागरिकत्व मिळाल्यास त्या रिपब्लिकन पक्षाच्या चिन्हावर निवडणूक लढवतील. 2024 मध्ये निवडणूक लढवू शकतो. अट एवढीच आहे की, त्यांना इथले नागरिकत्व मिळाले पाहिजे.’ (हेही वाचा: Anju-Nasrullah Case: पाकिस्तानी मित्राशी लग्न केलेल्या भारतीय महिलेचा देशात पतीला फोन;'मुलांनाही पाक मध्ये नेण्याचा' बोलून दाखवला मानस)
रामदास आठवले हे राज्यसभेचे खासदार आहेत आणि केंद्र सरकारमध्ये सामाजिक न्याय आणि अधिकारिता राज्यमंत्री आहेत. ते रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे राष्ट्रीय अध्यक्ष आहेत. त्यांच्या पक्षाची महाराष्ट्रात चांगली व्होट बँक मानली जाते.