Salaried Job Cuts: कोरोना विषाणूमुळे भारतामध्ये एप्रिल पासून 1.89 कोटी लोकांच्या नोकऱ्या गेल्या; जुलैमध्ये 50 लाख लोकांनी नोकऱ्या गमावल्या – CMIE

या साथीचा परिणाम नोकरदार वर्गावरही झाला आहे. एकीकडे कोट्यवधी लोकांना नोकर्‍या गमवाव्या लागल्या असताना, दुसरीकडे काम असलेल्या लोकांच्या पगारामध्ये कपात केली जात आहे.

Job (Photo Credits: Twitter)

कोरोना विषाणूच्या (Coronavirus) साथीने जवळजवळ सर्व क्षेत्रामध्ये प्रचंड नुकसान झाले आहे. या साथीचा परिणाम नोकरदार वर्गावरही झाला आहे. एकीकडे कोट्यवधी लोकांना नोकर्‍या गमवाव्या लागल्या असताना, दुसरीकडे काम असलेल्या लोकांच्या पगारामध्ये कपात केली जात आहे. आता सेंटर फॉर मॉनिटरींग इकॉनॉमीने (CMIE) म्हटले आहे की, जुलै महिन्यात सुमारे 50 लाख लोकांनी नोकर्‍या गमावल्या आहेत. अशाप्रकारे कोरोना व्हायरस साथ आणि लॉकडाऊनमुळे एप्रिलपासून आतापर्यंत 1.89 कोटी लोकांच्या नोकऱ्या गेल्या आहेत. जूनमध्ये अनलॉकिंग प्रक्रियेसह काही प्रमाणत नोकऱ्या उपलब्ध झाल्या होत्या, परंतु स्थानिक पातळीवर चालू असलेल्या लॉकडाऊनमुळे जुलैमध्ये पुन्हा नोकर्‍या कमी झाल्या.

सीएमआयईच्या म्हणण्यानुसार एप्रिल 2020 मध्ये 1.77 कोटी लोकांना नोकर्‍या गमवाव्या लागल्या. मे महिन्यात 10 लाख लोकांच्या नोकर्‍या गेल्या. यानंतर जूनमध्ये 39 लाख लोकांना नोकर्‍या मिळाल्या. पण आता जुलैमध्ये पुन्हा एकदा निराशाजनक बातमी समोर आली आहे की 50 लाख लोकांच्या नोकर्‍या गेल्या आहेत. देशात उपलब्ध असलेल्या एकूण रोजगारांपैकी केवळ 21 टक्के लोक पगारदार वर्गात येतात. यावर, सीएमआयई म्हणते की, नोकरी करणार्‍यांची नोकरी सहजतेने जात नाही, परंतु एकदा नोकरी गेल्यास ती पुन्हा मिळणे कठीण होते.

सीएमआयईच्या मते, एप्रिलमध्ये छोटे व्यावसायिक, फेरीवाले आणि दैनंदिन मजुरी करणाऱ्या लोकांना फार मोठ्या अडचणींचा सामना करावा लागला. एप्रिलमध्ये ज्या 12.15 कोटी लोकांची नोकरी गेली, त्यापैकी 9.12 कोटी लोक या व्यवसायांमधील होते. या वर्गातील केवळ 32% लोकांना रोजगार मिळतो परंतु, या वर्गातील 75% लोकांनी आपले काम गमावले आहे. इतकेच नव्हे तर कोरोना काळात अनेक क्षेत्रातील कंपन्यांनी कर्मचार्‍यांचे पगारही कमी केले. त्याचबरोबर बर्‍याच कर्मचार्‍यांना विना पगार रजेवर पाठविण्यात आले. यामुळे अनेकांचे नुकसान झाले आहे.