केरळ: सुप्रीम कोर्टाच्या आदेशानंतरही शबरीमालामध्ये महिलांना प्रवेश नाही
शबरीमाला मंदिरात दर्शनासाठी महिला पोहोचल्या तेव्हा मंदिर पुजाऱ्याने पोलीस आणि प्रशासनास सांगितले की, महिलांनी मंदिरात प्रवेश केल्यास मंदिरातील धार्मिक विधी कार्य पूर्ण थांबविण्यात येईल.
सर्वोच्च न्यायालयाने आदेश दिल्यानंतरही केरळमधील शबरीमाला मंदिरात महिलांना प्रवेश मिळाला नाही. शबरीमाला मंदिरात महिलांनी प्रवेश करु नये यासाठी भक्तांनी शुक्रवारी तीव्र आंदोलन केले. आंदोलकांचा प्रचंड दबाव पाहून पोलीसही एक पाऊल मागे आले. त्यामुळे मंदिरात प्रवेश करण्यासाठी पोहोचलेल्या 'त्या' दोन महिलांनाही परत फिरावे लागले. दरम्यान, केरळ सरकारने म्हटले आहे की, मंदिरामध्ये सर्व वयोगटातील महिलांना प्रवेश करण्याचे स्वातंत्र्य आहे. मात्र, काही आंदोलकही मंदिरात प्रवेश करत होते. आम्ही आंदोलकांना मंदिरात प्रवेश देण्यास मान्यता देऊ शकत नाही. दरम्यान, आज (शुक्रवार, १९ ऑक्टोंबर) ज्या दोन महिला मंदिरात प्रवेश करणार होत्या त्यापैकी एक आंदोलक होती.
केरळ सरकार आणि पोलीस प्रशासनाला शबरीमाला मंदिरासमोरील आंदोलकांच्या संतापास सामोरे जावे लागले. सुमारे २५० पोलीस कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेसह दोन महिलांनी मंदिरात प्रवेश करण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्याला यश मिळू शकले नाही. पोलिसांचा फैजफाटा सोबत असूनही या महिलांना मंदिर प्रवेशद्वारावरुनच परत फिरावे लागले. या दोन महिलांमध्ये हैदाबादच्या मोजो टीव्हीच्या पत्रकार कविता जक्कल आणि कार्यकर्त्या रिहाना फातिमा यांचा समावेश असल्याचे समजते.
दरम्यान, या दोन महिला शबरीमाला मंदिरात दर्शनासाठी पोहोचल्या तेव्हा मंदिर पुजाऱ्याने पोलीस आणि प्रशासनास सांगितले की, महिलांनी मंदिरात प्रवेश केल्यास मंदिरातील धार्मिक विधी कार्य पूर्ण थांबविण्यात येईल. त्यानंतर त्या महिलांना घेऊन पोलीस बेस कॅम्पमध्ये आले. आयजी एस श्रीजी यांनी सांगितले की, आम्ही महिला भक्तांना परिस्थितीची जाणीव करुन दिली आहे. त्यांना समजून सांगितले आहे. त्यामुळे त्या परत जातील. तणावपूर्ण स्थिती पाहून आम्हीही काही पावले परत फिरत असल्याचे आयजींनी या वेळी सांगितले. (हेही वाचा, केरळ: शबरीमाला मंदिरात महिलांना मिळणार ऐतिहासिक प्रवेश, न्यायालयाच्या आदेशाची काही मिनिटांतच अंमलबजावणी)
दरम्यान, शबरीमाला मंदिर वादावार केरळ सरकारने आपली बाजू मांडली आहे. सरकारच्या वतीने काडाकमपल्ली सुंदरन यांनी सांगितले की, मंदिरामध्ये भक्तांसोबत काही आंदोलकही प्रवेश करण्याचा प्रयत्न करत होते. त्यामुळे नेमके भक्त कोण आणि आंदोलक कोन यातला फरक ओळखणे कठीण आहे. आम्हाला माहिती मिळाली आहे की, मंदिरात प्रवेशासाठी २ कार्यकर्ता आंदोलक आले आहेत. ज्यात एका पत्रकाराचाही समावेश आहे. सर्व वयोगटातील महिलांना मंदिरात प्रवेश करण्याचे स्वातंत्र्य आहे. मात्र, कोणत्याही आंदोलकाला मंदिरात येऊन ताकद दाखवण्यास सरकार मान्यता देऊ शकत नाही.