Revanth Reddy is Next Telangana CM: रेवंत रेड्डी होणार तेलंगणाचे नवीन मुख्यमंत्री, 7 डिसेंबर रोजी घेणार शपथ, जाणून घ्या त्यांच्याबद्दल काही महत्वाच्या गोष्टी

तेलंगणा विधानसभा निवडणुकीच्या निकालाच्या एक दिवस आधी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष रेवंत रेड्डी कार्यकर्त्यांमध्ये पोहोचले तेव्हा त्यांच्या समर्थनार्थ ‘सीएम-सीएम’ अशा घोषणा देण्यात आल्या.

Revanth Reddy (संग्रहित संपादित प्रतिमा)

Telangana New CM: तेलंगणा विधानसभा निवडणुकीत काँग्रेसचा चेहरा असलेले रेवंत रेड्डी (Revanth Reddy) आता राज्याचे मुख्यमंत्री होणार आहेत. काँग्रेस पक्षाच्या सरचिटणीसांनी रेवंत रेड्डी यांच्या नावाला दुजोरा देताना सांगितले की, ते गुरुवारी, 7 डिसेंबर रोजी शपथ घेणार आहेत. तेलंगणा काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष रेवंत रेड्डी यांनी राज्यातील पक्षाच्या निवडणूक प्रचाराची सूत्रे हाती घेतली होती. सत्ताधारी बीआरएस (पूर्वी टीआरएस) आणि मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांच्याविरोधात त्यांनी आक्रमक भूमिका बजावली.

निवडणुकीत काँग्रेसचा विजय झाल्यापासून ते मुख्यमंत्रिपदाच्या संभाव्य उमेदवारांमध्ये आघाडीवर होते. तेलंगणा विधानसभा निवडणुकीच्या निकालाच्या एक दिवस आधी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष रेवंत रेड्डी कार्यकर्त्यांमध्ये पोहोचले तेव्हा त्यांच्या समर्थनार्थ ‘सीएम-सीएम’ अशा घोषणा देण्यात आल्या.

अविभाजित आंध्र प्रदेशातील महबूबनगर जिल्ह्यात 1969 मध्ये जन्मलेल्या अनुमुला रेवंत रेड्डी यांनी विद्यार्थीदशेपासूनच राजकारणाला सुरुवात केली. उस्मानिया विद्यापीठातून पदवी घेतलेले रेड्डी त्यावेळी अभाविपशी संबंधित होते. नंतर त्यांनी चंद्राबाबू नायडू यांच्या तेलगू देसम पक्षात प्रवेश केला.  टीडीपी उमेदवार म्हणून त्यांनी 2009 साली आंध्र प्रदेशच्या कोडंगल विधानसभा मतदारसंघातून निवडणूक जिंकली.

2014 मध्ये ते तेलंगणा विधानसभेत टीडीपीचे सभागृह नेते म्हणून निवडले गेले. 2017 मध्ये त्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. मात्र, 2018 च्या तेलंगणा विधानसभा निवडणुकीत ते टीआरएस उमेदवाराकडून पराभूत झाल्यामुळे काँग्रेसमध्ये सामील होणे त्यांच्यासाठी चांगले ठरले नाही. केसीआर यांनी निवडणुकीच्या वर्षभर आधीच विधानसभा बरखास्त करून निवडणुका घेतल्या होत्या. (हेही वाचा: DMK MP Gaumutra State Remark: 'भाजप फक्त गोमूत्र राज्य जिंकत आहे, त्यांना दक्षिणेत येऊ देणार नाही'; द्रमुक नेते S. Senthilkumar यांचे वादग्रस्त वक्तव्य)

विधानसभा निवडणुकीत पराभूत झाल्यानंतर, काँग्रेसने त्यांना 2019 च्या लोकसभा निवडणुकीत मलकाजगिरी येथून तिकीट दिले ज्यामध्ये ते 10,919 मतांनी विजयी झाले. 2021 मध्ये काँग्रेसने त्यांची प्रदेशाध्यक्षपदी निवड करून त्यांना मोठी जबाबदारी दिली. दरम्यान, काँग्रेसने तेलंगणात सरकार स्थापन केल्यास प्रत्येक बेरोजगार तरुणाला दरमहा 4 हजार रुपये, महिलांना 2500 रुपये, वृद्धांना 4000 रुपये दरमहा पेन्शन आणि शेतकऱ्यांना 15 हजार रुपये देण्याचे आश्वासन दिले होते. रेवंत रेड्डी यांनी संपूर्ण निवडणूक प्रचारात काँग्रेसच्या या आश्वासनांचा प्रचार केला.