Retail Inflation Data: सणासुदीच्या दिवसांपूर्वी सर्वसामान्यांना महागाईबाबत मोठा दिलासा; सप्टेंबरमध्ये किरकोळ महागाई कमी होऊन 5 टक्क्यांवर
नॅशनल स्टॅटिस्टिकल ऑफिस (NSO) ने गुरुवारी जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार, औद्योगिक उत्पादन निर्देशांक (IIP) च्या आधारे मोजले जाणारे औद्योगिक उत्पादन गेल्या वर्षी याच महिन्यात 0.7 टक्क्यांनी घसरले होते.
सणासुदीच्या दिवसांआधी महागाईपासून (Retail Inflation) नागरिकांना थोडा दिलासा मिळाला आहे. सप्टेंबरमध्ये किरकोळ महागाई दरात घट झाली आहे. किरकोळ महागाई सप्टेंबरमध्ये 5.02 टक्क्यांवर आली आहे, जी तीन महिन्यांतील नीचांकी पातळी आहे. ऑगस्टमध्ये महागाई दर 6.83 टक्के होता. तर गेल्या वर्षी सप्टेंबरमध्ये किरकोळ महागाईचा दर 7.41 टक्के होता. सप्टेंबरमध्ये अन्नधान्य महागाई 6.56 टक्के होती, जी ऑगस्टमध्ये 9.94 टक्के होती. ग्रामीण आणि शहरी भागांबद्दल बोलायचे झाल्यास, सप्टेंबर महिन्यात किरकोळ महागाई दर अनुक्रमे 5.33 टक्के आणि 4.65 टक्के होता.
यापूर्वी जुलैमध्ये किरकोळ चलनवाढीचा दर 7.44 टक्क्यांच्या 15 महिन्यांतील उच्चांकावर पोहोचला होता. जूनमध्ये किरकोळ महागाईचा दर 4.87 टक्के होता.
चालू आर्थिक वर्षात महागाई दर 5.4 टक्के राहण्याचा अंदाज आरबीआयने व्यक्त केला आहे. दुसऱ्या तिमाहीत 6.2 टक्के, तिसऱ्या तिमाहीत 5.7 टक्के आणि चौथ्या तिमाहीत 5.2 टक्के राहण्याची अपेक्षा आहे. पहिल्या तिमाहीत महागाई 5.2 टक्के राहण्याचा अंदाज आहे. ऑगस्ट महिन्यात देशाचे औद्योगिक उत्पादन (IIP) 10.3 टक्क्यांनी वाढले आहे. (हेही वाचा: RBI Penalty On Paytm Payments Bank: आरबीआयची 'पेटीएम पेमेंट बँक'वर मोठी कारवाई; ठोठावला कोट्यावधी रुपयांचा दंड)
नॅशनल स्टॅटिस्टिकल ऑफिस (NSO) ने गुरुवारी जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार, औद्योगिक उत्पादन निर्देशांक (IIP) च्या आधारे मोजले जाणारे औद्योगिक उत्पादन गेल्या वर्षी याच महिन्यात 0.7 टक्क्यांनी घसरले होते. आकडेवारीनुसार, ऑगस्ट 2023 मध्ये उत्पादन क्षेत्राचे उत्पादन 9.3 टक्क्यांनी वाढले आहे. तर खाण उत्पादनात 12.3 टक्के आणि वीज उत्पादनात 15.3 टक्के वाढ झाली आहे. आकडेवारीनुसार, चालू आर्थिक वर्षातील एप्रिल-ऑगस्ट या पहिल्या पाच महिन्यांत औद्योगिक उत्पादनात 6.1 टक्क्यांनी वाढ झाली आहे. गेल्या वर्षी याच कालावधीत औद्योगिक उत्पादनाची वाढ 7.7 टक्के होती.