Rajnath Singh Speaks to Madan Sharma: संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी शिवसैनिकांकडून हल्ला झालेल्या माजी नौदल अधिकारी मदन शर्मा यांच्या प्रकृतीची केली चौकशी; अशा प्रकराचे हल्ले निंदनीय असल्याचे वक्तव्य
माजी सैनिकांवर होणारे हल्ले अत्यंत निंदनीय असल्याचे म्हणत त्यांनी या घटनेबद्दल शोक व्यक्त केला
मुंबईत (Mumbai) शिवसैनिकांनी मारहाण केलेल्या माजी नौदल अधिकारी (Ex-Navy Officer) मदन शर्मा (Madan Sharma) यांची संरक्षणमंत्री राजनाथ सिंह (Defence Minister Rajnath Singh) यांनी फोन करुन चोकशी केली. माजी सैनिकांवर होणारे हल्ले अत्यंत निंदनीय असल्याचे म्हणत त्यांनी या घटनेबद्दल शोक व्यक्त केला. तसंच मदन यांच्या प्रकृतीत लवकरात लवकर सुधारणा व्हावी, अशी इच्छाही व्यक्त केली.
"मुंबईत मारहाण केलेल्या निवृत्त नौदल अधिकारी मदन शर्मा यांच्याशी मी बोललो. त्यांच्या तब्येतीची चौकशी केली. माजी सैनिकांवर होणारे अशा प्रकारचे हल्ले अत्यंत निंदनीय असून अस्वीकार्य आहेत. मला आशा आहे की, मदन जींच्या प्रकृतीत लवकरच सुधारणा होईल," असे संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे. मदन शर्मा यांच्याशी फोनवरुन संवाद साधल्यानंतर संरक्षणमंत्र्यांनी ही माहिती दिली.
Rajnath Singh Tweet:
मदन शर्मा हे निवृत्त नौदल अधिकारी आहेत. 65 वर्षीय शर्मा नौदलातून Chief Petty Officer म्हणून निवृत्त झाले. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि शिवसेनाप्रमुख उद्धव ठाकरे यांचे कॉर्टुन शेअर केल्यामुळे शिवसैनिकांकडून त्यांना मारहाण करण्यात आली.
शिवसेनेच्या कांदिवली विभागातील शाखा प्रमुख कमलेश कदम यांना मदन शर्मा यांच्यावर हल्ला केला. या प्रकरणी कदम यांच्यासह चार जणांना अटक करण्यात आली होती. मात्र आज त्यांची जामिनावर सुटका करण्यात आली. मदन शर्मा यांच्यावर झालेला हल्ला सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे.
मुंबईत झालेल्या या हल्ल्यावर चहुबाजूंनी टीका होत आहे. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी 'उद्धव ठाकरे गुंडाराज थांबवा,' असे म्हटले आहे. तसंच गुन्हेगारांविरुद्ध कठोर कारवाई आणि शिक्षा करण्याची त्यांनी मागणी केली आहे.